चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कायम ठेवायची की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी याबाबत प्रदेश काँग्रेस समिती निर्णय घेईल, असे सांगितले. मात्र खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्या, असा सूर आवळला आहे. विशेष म्हणजे, प्रदेश काँग्रेसनेदेखील याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे सांगितल्याची माहिती आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश, तरी पी.ए. होण्यासाठी उड्यावर उड्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी तीन महिन्यात होतील, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच प्रमुख पक्ष महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपने सदस्य मोहिमेची सुरुवातही केली आहे. त्या तुलनेत काँग्रेसचे काम संथगतीने सुरू आहे. अशातच, या निवडणुकांत महाविकास आघाडी कायम ठेवायची की नाही, याबाबत काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. हा निर्णय प्रदेश काँग्रेस समितीचा आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी उमेदवारीवरून आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वतंत्र लढाव्या, असा सूर खासदार धानोरकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनीही आवळला आहे.