यवतमाळ : चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपाने अनपेक्षितपणे उमेदवार बदलविला. गेल्यावेळी उमेदवार असलेले हंसराज अहीर यांना डावलून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. मुनगंटीवार यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या यवतमाळ जिल्हयातील वणी, केळापूर या दोन विधानसभा मतदारसंघातील आणि सहा तालुक्यांतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर होताच मुनगंटीवार समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित व्हायचा आहे, मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाचे गणित मांडणे सुरू केले. मात्र मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्यातील राजकीय वितुष्ट बघता, लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले अहीर निवडणुकीत मुनगंटीवारांना साथ देतीलच याबद्दल साशंकता आहे.
हेही वाचा : अखेर ठगबाज मीरा फडणीस नागपूर पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वरदहस्तामुळे आतापर्यंत…
चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, पक्षाने मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. २०१४ च्या निवडणुकीत हंसराज अहीर यांनी काँगेसचे संजय देवतळे यांचा दोन लाख ३६ हजार १७९ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांनी भाजपाचे हंसराज अहीर यांचा ४४ हजार ७४४ मतांनी परावभव केला. राज्यात काँग्रेसचे एकमेव बाळू धानोरकर हे खासदार म्हणून निवडून आले होते. अहीर यांच्या पराभवामुळे भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त महाराष्ट्र’ घोषणेला तेव्हा खीळ बसली होती. हा पराभव भाजपाच्या श्रेष्ठींना जिव्हारी लागला होता. ज्यावेळी हंसराज अहीर यांची मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याचवेळी अहीर यांचा चंद्रपूर–आर्णी लोकसभा मतदारसंघातील दावा संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
हेही वाचा : डॉ. सुभाष चौधरी यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने निलंबनाला दिली तात्पुरती स्थगिती
भाजपाने सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपाने महाविकास आघाडीपुढे आव्हान उभे केले आहे. तरीही, सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. या मतदारसंघात जातीय समीकरणे कायमच वरचढ ठरले आहेत. मतदारसंघातील धनोजे कुणबी समाजाची मते नेहमीच निर्णायक ठरली. महाविकास आघाडीने येथे धनोजे कुणबी समाजाचा उमेदवार दिल्यास मुनगंटीवार यांच्यापुढील अडचणी वाढू शकतात. मुनगंटीवार ज्या आर्यवैश्य समाजाचे नेतृत्व करतात तो समाज आर्णी येथे मोठ्या संख्येने आहे. मात्र आदिवासी, बंजारा, मराठा (कुणबी), मुस्लीम या समाजाच्या तुलनेत तो कमीच आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना जातीय समीकरणांसोबतच सामाजिक समीकरणावर भर द्यावा लागणार आहे. वणी आणि केळापूर मतदारसंघात भाजपाचे आमदार असले तरी हे मतदारसंघ पारंपरिक काँग्रेसचे आहेत. या मतदारसंघात संघ, भाजपाचे पारंपरिक मतदार नाहीत, याकडेही लक्ष द्यावे लागेल. २०१४ आणि २०१९ मध्ये येथील भाजपाचे दोन्ही आमदार हे नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या लाटेत निवडून आले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे.
हेही वाचा : गडचिरोलीसाठी भाजपा धक्कातंत्र वापरणार? दुसऱ्याही यादीत नाव नसल्याने इच्छुक अस्वस्थ
काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी नेहमीसारख्या लाथाळ्या सुरू आहेत. खासदार सुरेश धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आ. प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या, युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नात आहेत. त्यामुळे आता या दोघांपैकी कोण बाजी मारते, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.