चंद्रपूर : शिवसेनेमुळेच भाजपा आज दिल्लीच्या तख्तावर विराजमान आहे. शिवसैनिक नसता तर राज्यात भाजपाची अवस्था बिकट होती, अशी टीका शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांनी केली. येथील मातोश्री विद्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्याला आमदार जाधव यांनी मार्गदर्शन करीत शिवसेना-भाजपा युतीचा इतिहास सांगितला.
८६-८७ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजपा युती झाली त्यावेळी भाजपाला राज्यात कुणी ओळखत नव्हतं. त्यासाठी शिवसैनिक राबला. आज भाजपा दिल्लीच्या तख्तावर विराजमान आहे, हे केवळ शिवसेना आणि शिवसैनिकांमुळेच शक्य झाले. मात्र भाजपाने आपला शब्द पाळला नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करीत सत्ता स्थापन केली. परंतु आपल्या गद्दारांनी भाजपासोबत जात ठाकरेंना धक्का दिला. गद्दार म्हणतात की, तुम्ही राष्ट्रवादी व काँग्रेससोबत गेलात म्हणून आम्ही वेगळे झालो. मग, अडीच वर्षे मंत्रिपद उपभोगताना या गद्दारांना लाज वाटली नव्हती का? असा प्रश्न आमदार जाधव यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : वाशीम : सरपंच, ग्रामसेवक संपावर, ग्रामपंचायती कुलूबपंद; कामकाज ठप्प!
कार्यक्रमापूर्वी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या भव्य बाईक रॅलीने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले. ही बाईक रॅली शहराचे भ्रमण करीत मातोश्री विद्यालयात कार्यक्रमस्थळी दाखल झाली. मेळाव्याला जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, मुकेश जीवतोडे, शहर प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, युवासेना सरचिटणीस रोहिणी पाटील, जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, महिला जिल्हाप्रमुख उज्वला नलगे, प्रमोद पाटील, सुरेश पचारे आदींची उपस्थिती होती.