चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कायम ठेवत एनडीएचे प्रमुख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवणार व महायुती राज्यात ४५ खासदार निवडून आणणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. दरम्यान २५ वर्ष विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत असल्याची स्पष्ट कबुली तटकरे यांनी दिली.
विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले प्रदेशाध्यक्ष तटकरे हे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या चार जिल्ह्यानंतर मंगळवारी सायंकाळी या चंद्रपूरमध्ये दाखल झाले. विश्रामगृह येथे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्र परिषदेत तटकरे यांनी सतत २५ वर्ष विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर असल्याचे मान्य केले. घड्याळ तीच, वेळ नवी हा नारा देत आता आम्ही संपूर्ण विदर्भ पिंजून काढत आहोत.
राज्यात भापज व शिंदे शिवसेना यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय लोकशाही पद्धतीने घेतला. अचूक वेळ साधण्याचा प्रयोग आम्ही केला. त्याला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात महायुतीला ग्रामपंचायत निवडणुकीत यश, अजित पवार यांच्या नेतृत्वात सर्वाधिक ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. विदर्भात पक्ष संघटन वाढविण्यात यश मिळाले नाही, मात्र उद्याच्या भवितव्यात यश मिळेल ही आशा आहे. २०१९ मध्ये राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्यामुळे राज्याच्या जनतेच्या मनात अनेक प्रस्न निर्माण झाले आहेत ही वसतुस्थिती आहे.
हेही वाचा : नागपुरात कुणबी नोंदीची तपासणी युद्धपातळीवर , जिल्हाधिकाऱ्यांचे काय आहेत आदेश?
राज्यात निर्माण झालेल्या अस्थीरतेबाबत राज्यातील जनता योग्य निर्णय घेईल व लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विजयी करेल. आगामी निवडणूक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविणार आहे. दरम्यान कुणी काहीही म्हणत असेल तरी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झालेली नाही. गुणवत्तेनुसर जागांबाबत चर्चा करू. भाजप मध्ये विलीन होणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्व ठेवून निवडणूक लढणार आहे असेही तटकरे म्हणाले. मराठ्यांना आरक्षण मिळावे ही सरकारची व पक्षाची भूमिका आहे. ओबीसी मुद्यावर छगण भुजबळ पक्षात एकाकी पडले आहेत असे विचारले असता , तसे काहीही नाही असे म्हणाले. जरांगे यांचे आंदोलन सरकार पुरस्कृत की विरोधक पुरस्कृत यावर तटकरे यांनी मौन पाळले. तर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर आपण शूद्र आहे याब्बत विचारले असता सदर विषय आपल्यासाठी संपला असल्याचे ते म्हणाले.