चंद्रपूर : ‘बियर शॉपी’च्या परवान्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारणारे दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. मात्र, गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे पाटील यांची अटक अटळ मानली जात आहे.
‘बियर शॉपी’ परवान्यासाठी खारोडे आणि खताळ यांनी अधीक्षक पाटील यांच्या निर्देशानुसार एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार घुग्घुस येथील एका मद्यालय संचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली होती. ‘एसीबी’ने मंगळवारी खारोडे व खताळ या दोघांना एक लाखाची लाच स्वीकारताना अटक केली. सुटीवर असलेले अधीक्षक पाटील यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : वाशीम: मतदानानंतर कालांतराने वाढलेल्या टक्केवारीवर आक्षेप; निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
खारोडे व खताळ या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जिल्हा न्यायालयाने आज दोघांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला, तर अधीक्षक पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे पाटील यांची अटक अटळ मानली जात आहे. दरम्यान, पाटील उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.