चंद्रपूर: शिवसेना उध्दव ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे याच्या विरूध्द रामनगर पोलीस ठाण्यात भटाळी येथील वेकोलि खुली कोळसा खाण येथे काम करणाऱ्या कावेरी सी. ५ जेव्ही या कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक यांना पाच लाखाची खंडणी मागणीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी सावली येथे शिंदे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरूध्द पोलीस ठाण्यात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख यांनी खंडणीचा कारणामा केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे युवासेना प्रमुख विक्रांत सहारे याला मागील वर्षी जिवंत काडतुस व देशीकट्ट्यासह अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता खंडणी प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेत आहे.

पोलीसांनी येथे प्रसिध्दीला दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी कावेरी सी ५ जेव्ही कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर व्यंकटेश्वर रामण्णा रेड्डी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांच्या कंपनीच्या एच. आर. व्यवस्थापक यांनी एका अल्पवयीन बालकास कामावर ठेवले होते, सदर बाब त्यांचे लक्षात येताच, त्यांनी सदर मुलास कामावरून कमी केले, त्यानंतर मुलाची आई आणि विक्रांत सहारे हे त्यांचे कंपनीत येऊन मुलाला मारहाण का केली असे खोटे आरोप करून कामगार आयुक्त, चंद्रपूर यांच्याकडे तक्रार नोंदवली. यावरून कंपनीचे मॅनेजर आणि एच. आर. हे विक्रांत सहारे यांचे कार्यालयात जाऊन खोटी तक्रार का केली अशी विचारणा केली. तेव्हा विक्रांत सहारे यांनी आता माझा इगो हर्ट झाला आहे. मला पाच लाख रुपये द्या आणि माझ्या दहा लोकांना कामावर ठेवा अन्यथा मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन कंपनीची बदनामी करेल अशी धमकी दिली. या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात विक्रांत सहारे यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिल्हयातील सर्व उद्योग धंदे व व्यवसायीक यांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही कायदेशीर कामकाजात त्यांना बेकायदेशीर अडथळा निर्माण करत असेल, खंडणी मागत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला संपर्क साधुन तक्रार दयावी, संबंधीतांविरुध्द तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते स्थानिक उद्योग, व्यवसायीक, बियर बार संचालक, ऑनलाईन लॉटरी बुकी, सट्टा बुकी तसेच अवैध व्यवसाय करणारे आणि दारूविक्रेते यांना अशाच प्रकारे खंडणी व पैशाची मागणी करित असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत.