चंद्रपूर : पोंभुर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्कमध्ये असलेले आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे तसेच झेंडा हटविल्यावरून मागील चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन चिघळले. आंदोलकांनी वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच आंदोलनकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
शनिवारीसुध्दा आदिवासी बांधवांनी आंदोलन सुरूच ठेवले असून जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जागेवरून हटणार नसल्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. पोंभुर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्कमध्ये असलेले आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे तसेच झेंडा हटविल्यावरून मागीच पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी कोणताही तोडगा निघाला नसल्याने आंदोलनकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची तोडफोड केली.
हेही वाचा : ड्रग प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते…; बावनकुळे यांचा गंभीर आरोप
यादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. शनिवारी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सुध्दा आदिवासी बांधवांनी इको पार्कसमोर आंदोलन सुरूच ठेवले आहे. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा लावण्यात यावा तसेच हटविणाऱ्यांविरूध्द ॲट्रासिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी मागणी आहे.
हेही वाचा : भाजपाने शिंदे, अजित पवारांना नाक घासून…; नाना पटोले स्पष्टच बोलले
दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू आंदोलन स्थळी दाखल झाले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे जगन येलके यांच्याशी चर्चा केली. मात्र. कोणताही तोडगा निघाला नाही.