नागपूर : बहुप्रतिक्षित आणि तेवढीच वादग्रस्त ठरलेली यंदाची तलाठी पदभरती पुन्हा चर्चेत आली आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल करण्यात आल्याने इतर मागासवर्गातील पदांची संख्या घटली आहे. त्यामुळे नोकरीसाठी आस लावून बसलेल्या ओबीसी उमेदवारांमध्ये नाराजी आहे. राज्याच्या महसूल व विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांसाठी सरळसेवा भरती जाहिरात देण्यात आली. त्यानंतर राज्यातील ३६ जिल्ह्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुन्या अधिसूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसींच्या ४६ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. या जिल्ह्यासाठी १८७ पदांची भरती होणार होती. त्यात ओबीसी प्रवर्गात ४६, सर्वसाधारण प्रवर्गात १४, महिलांसाठी १५, खेळाडूंसाठी तीन, माजी सैनिकांसाठी सात, प्रकल्पग्रस्तांकरिता दोन आणि भूकंपग्रस्तासाठी एक आणि पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी चार पदे होती. ऑनलाईन परीक्षा झाली आणि पहिली उत्तरतालिका देखील प्रसिद्ध झाली. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२३ रोजी नवीन अधिसूचना प्रसिद्ध झाली. त्यात एकूण पदांची संख्या १८७ वरून १५९ अशी कमी करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गात २७, सर्वसाधारण-आठ, महिला आठ, खेळाडू-दोन, माजी सैनिक चार, प्रकल्पग्रस्त एक, भूपंकग्रस्त एक, पदवीधर अंशकालीन तीन अशी नवीन क्रमवारी आहे. बिंदूनामावलीतील बदलाचा फटका इतर जिल्ह्यातील ओबीसी युवकांनाही बसला आहे.

हेही वाचा : हिवाळी अधिवेशन : चंद्रकांतदादांच्या शेजारी मुश्रीफ, मुनगंटीवार यांच्या बाजूला विखे

अचानक पदसंख्या घटवली

“चंद्रपूर जिल्ह्यात तलाठयांची अधिक पदे असल्याने अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले. पण, आता परीक्षा झाली आणि अचानक पदांची संख्या कमी करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी निराश झाले आहेत.” – उमेश कोर्राम, अध्यक्ष, स्टुडंटस राईटस असोसिएशन ऑफ इंडिया.

“शासनाच्या धोरणानुसार जेवढी तलाठी भरती आवश्यकता होती तेवढी पदसंख्या निश्चित करण्यात आली. न्यायालयाच्या सूचनेनुसार अनुकंपा तत्त्वावर काही पदे भरण्यात आली होती. यातून ती पदे कमी झाली. त्यामुळे पदसंख्येत फरक पडला. पण, पदसंख्या कोणत्याही जिल्ह्यात शून्य झालेली नाही.” – सरिता नरके, प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अतिरिक्त जमाबंदी आयुक्त.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur posts for obc in talathi recruitment decreased rbt 74 css