चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले होताच पहिल्याच दिवशी सचिन तेंडूलकर यांची ‘एन्ट्री’ झाली. आतापर्यंत सचिन तेंडूलकर यांनी सातव्यांदा ताडोबा पर्यटनाला भेट दिली आहे. ताडोबात पहिल्याच दिवशी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी दिसून आली.ताडोबाच्या कोर अधिवासापेक्षाही बफर क्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे. व्याघ्रदर्शन देखील सहज होत असल्याने पर्यटकांचा ओढा या क्षेत्राकडे आहे. प्रामुख्याने ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोर अधिवासापेक्षाही बफर क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकच नाहीत तर ख्यातनाम व्यक्ती देखील बफरमधील पर्यटनाला पहिली पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : बनावट औषध प्रकरण : चारही औषध कंपन्यांच्या मालकावर गुन्हे
ताडोबा कोर गेट सुरू होताच क्रिकेटचा वाघ सचिन तेंडुलकर आपल्या पत्नी व मित्राच्या कुटुंबासोबत ताडोबातील वाघाच्या भेटीला तीन दिवसांच्या मुक्कामी आला आहे. क्रिकेटच्या वाघाला ताडोबातील वाघ पाहण्याची इतकी आतुरता निर्माण झालेली होती. आल्याआल्याच ताडोबा कोरमधून दुपारची सफारी केली असता बिजली व छोटी तारा वाघिणीचे दर्शन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास पुनः कोलारा गेटमधून कोरला सफारी केली असता, झरणी वाघिणीचे दर्शन झाले. तर बफर झोनमध्ये रामदेगी नवेगाव परिसरात छोटा मटका वाघाने हुलकावणी दिली असल्याचे समजते. सचिनने दुपारी कुठेच न जाता रिसोर्टवरच आराम केल्याची विशेष सूत्रांकडून माहिती मिळाली. तर अंजली तेंडुलकर व इतरांनी कोलारा गेट वरून सफारी केली असता छोटी तारा वाघिणीचे बछडे व अन्य वाघाचे दर्शन झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळची सफारी करून दुपारी चार वाजताच्या दरम्यान बांबू रिसोर्ट येथून नागपूरकडे प्रयाण करणार असल्याची माहिती आहे. ताडोबा प्रकल्पाचे सचिनला विशेष आकर्षण असल्यानेच सातव्यांदा ताडोबात दाखल झाला असून पर्यटनाचा मुनमुराद आनंद लुटत आहे.