चंद्रपूर : राज्यात जोरदार थंडी पडण्यास सुरूवात झाली आहे. देशासह राज्यात सर्वाधिक उष्ण शहर असलेले चंद्रपूर हे हिवाळ्यात गारठले असून तापमान ९.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. विदर्भात गारठलेल्या शहरात चंद्रपूरने तिसरा क्रमांक गाठला आहे. राज्यात डिसेंबरच्या सुरूवातीला अवकाळी पावसानंतर गुलाबी थंडी पडण्यास सुरूवात झाली आहे. चंद्रपूर जिल्हा हा उन्हाळ्यात देशासह राज्यात सर्वाधिक उष्ण म्हणून ओळखला जातो. मात्र, मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या थंडीमुळे चंद्रपूर जिल्हा गारठला आहे.
हेही वाचा : चंद्रपूर : जबर धडकेत नीलगायीचा मृत्यू, चंद्रपूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचे वाहन
जिल्ह्याचे तापमान ९.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हे तापमान विदर्भात तिसऱ्या क्रमांकाचे कमी तापमान आहे. विदर्भात सर्वाधिक तापमान यवतमाळ ९.५, गोंदिया ९, चंद्रपूर ९.२, गडचिरोली ९ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे जिल्ह्यात हुडहुडी निर्माण झाली असून जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. सायंकाळचे पाच वाजल्यापासून थंडी वाजण्यास सुरूवात होत आहे.