चंद्रपूर: गोतस्करी करणाऱ्या आरोपींना बल्लारपूर न्यायालयाने मोठी चपराक दिली असून तस्करी केलेल्या ३६ जनावरांच्या देखभालीचे २०० रूपये प्रतिदिवस प्रमाणे ७ महिने १९ दिवसांचे तब्बल १६ लाख ७० हजार ४०० रूपये गौरक्षण सेवा मंडळ लोहारा या गोशाळेत जमा करण्याचे आदेश जारी केला आहे. त्यामुळे गोतस्करांचे धाबे दणाणले आहे.
बल्लारपूर पोलिसांनी तेलगंणात गोतस्करी करतांना बामणी फाट्यावर एक ट्रक जप्त केला. या ट्रकमध्ये तब्बल ३६ जनावरे कोंबून कत्तलसाठी नेण्यात येत होती. ही कारवाई १० जानेवारी करण्यात आली होती. कारवाई नंतर सर्व जनावरांची गौरक्षण सेवा मंडळ लोहारा या गोशाळेत रवानगी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी आरोपी अब्दुल समीर अब्दुल जाहीर शेख याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आरोपींने गुन्ह्यात वापरलेली वाहन सोडविण्यासाठी धडपड सुरू केली.
हेही वाचा… ताडोबात जंगल सफारीसाठी नवीन संकेतस्थळाची चाचपणी सुरू
पोलिसांनी प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. बल्लारपूर तालुका न्यायालयाने न्यायाधीश अनुपम शर्मा यांनी दोन्ही बाजूचे साक्ष व पुराव्याच्या आधारे आरोपी अब्दुल समीर अब्दुल जाहीर शेख याला कत्तलीसाठी नेत असलेल्या ३६ जनावरांचा १० जानेवारी २०२३ पासून ते २९ ऑगस्ट २०२३ पर्यंतचा खर्च प्रतिदिवस २०० रूपये याप्रमाणे १६ लाख ७० हजार ४०० रूपये गोशाळेत जमा करण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे गोतस्करांचे धाबे दणाणले आहे. उज्वल गौरक्षण संस्था, लोहारातफेर ॲड. विकास गेडाम यांनी काम पाहिले.