नागपूर : राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष टोकाच्या पलीकडे गेला. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातच या संघर्षाची झळ दिसून येत होती, पण आता सर्वत्र हे लोन पसरत चालले आहे. यात माणसांचा बळी जात आहे आणि प्राण्यांचा देखील. मात्र, या संघर्षाच्या मुळाशी न जाता त्याचे खापर मात्र त्या प्राण्यावरच फोडले जात आहे आणि त्याला कायमचे गजाआड केले जात आहे. त्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मुक्ततेसाठी निर्णय घेण्याकरिता समिती गठीत केली आहे.

मात्र, ते प्रकरण समितीपुढे येऊच दिले जात नाही आणि तो प्राणी कायमचा बंदिवासात जातो. आतापर्यंत अशा कित्येक वाघांना वनखात्याने कायमचे जेरबंद करून टाकत स्वतःची जबाबदारी ढकलण्याचाच प्रयत्न केला आहे. भंडारा येथील लाखांदूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या वाघ आणि वाघिणीला जेरबंद करण्यात आल्यानंतर त्यांना नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले. या वाघ आणि वाघिणीला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले. पशुवैद्यकीय डॉक्टरांची एक चमू या वाघ आणि वाघिणीवर लक्ष ठेवून आहेत.

लाखांदूर तहसीलमधील दांभेविराली, टेंभारी आणि गावराळा गावांच्या आसपासच्या परिसरात वाघ आणि वाघिणीने अनेक गुरे मारली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले. त्यांना जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. यानंतर तीन एप्रिलला वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. या वाघाप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून एका वाघिणीने देखील गावात दहशत निर्माण केली होती. तीनेही गावातील गावकऱ्यांची अनेक गुरे फस्त केली.

पाच एप्रिलला सकाळी वाघिणीने गावराळा गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात बांधलेल्या गुरांची शिकार केली होती. त्यामुळे तिलाही बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. या वाघ आणि वाघिणीला जेरबंद करण्यासाठी परवानगी मागणारा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर, वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. सहा एप्रिलला वाघिणीला पुढील उपचारांसाठी नागपूरमधील गोरेवाडा बचाव केंद्रात आणण्यात आले व वाघ आणि वाघिणीला विलगीकरणात ठेवण्यात आले.