चंद्रपूर : तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील नवानगर येथील जनाबाई जनार्धन बागडे (५१) या महिलेसह तर नागभीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळी येथील शेतकरी दोडकू शेंदरे या दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. जेरबंद करण्यात आलेला वाघ हा टी-११५ या वाघिणीचा २० महिन्यांचा नर बछडा आहे.
तळाेधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३२ मध्ये टी-११५ या वाघिणीचा २० महिन्यांच्या बछड्याने धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेतला आहे. २३ जुलै रोजी नागभीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळी रस्त्यालगतच्या दोडकू शेंदरे या शेतकऱ्यांचा तर नवानगर येथे जनाबाई जनार्धन बागडे या महिलेचा बळी घेतला होता. या वाघामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. सदरच्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी लावून धरली होती. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने नवानगर परिसरातील कक्ष क्रमांक १३२ मध्ये पिंजरे लावण्यात आले होते.
हेही वाचा : ग्रामसेवक पदाच्या परीक्षेसाठी पूर्व विदर्भातील परीक्षार्थींना थेट पश्चिम महाराष्ट्रात परीक्षा केंद्र
वनविभागाचे पथक वाघाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. ताडोबाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे, शुटर ए.सी.मराठे यांनी वाघाला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद केले आहे. यावेळी डॉ. खोब्रागडे यांनी वाघाची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर वाघाला जेरबंद करून प्राणी बचाव केंद्रात नेण्यात आले आहे. धुमाकूळ घालून दोन जणांच्या बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागिरकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. वाघाला जेरबंद करण्याची कारवाई डॉ. आर. एस. खोब्रागडे, शुटर ए.सी.मराठे, राकेश आहुजा (बायोलॉजिस्ट), दिपेश. डि.टेंभुर्णे, योगेश. डि.लाकडे, गुरुनानक .वि.ढोरे, वसीम.ऐन.शेख, विकाश.एस.ताजने, प्रफुल.एन.वाटगुरे, ए. डी. कोरपे, ए. एम. दांडेकर यांच्यासह जलद कृती दलाच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा : गडचिरोली : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडूनच आपत्ती व्यवस्थापनाचे नियम धाब्यावर, सुरक्षा जॅकेटविना छोट्या नावेतून…
ताडोबाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी जिल्ह्यामध्ये झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डॉ. खोब्रागडे यांनी आतापर्यंत ७० वाघांना यशस्वीरित्या जेरबंद केले आहे. विशेष वाघाला जेरबंद करतांना त्यांना हाताचा एक बोटसुध्दा गमवावा लागला आहे.