नागपूर : आतापर्यंत तीन गावकऱ्यांना जखमी करणाऱ्या वाघिणीला जेरबंद करुन अवघ्या काही तासातच तिला दुसऱ्या अधिवासात मुक्त करण्यात आले. दरम्यान, वनखात्याने घेतलेल्या या निर्णयाचे वन्यजीव अभ्यासकांकडून स्वागत करण्यात आले. मानव-वन्यजीव संघर्षात एकदा वाघाला जेरबंद केल्यानंतर तो कायमचा जेरबंद होतो, हाच आजवरचा इतिहास आहे. मात्र, ब्रम्हपूरी वनविभागाने तीघांवर हल्ला करणाऱ्या वाघिणीला कायमचे जेरबंद न करता अवघ्या काही तासातच तिला घनदाट जंगलात मुक्त केले.

उत्तर ब्रह्मपुरी वनक्षेत्राच्या सीमेवरील गावांमध्ये वाघांची उपस्थिती ही एक सामान्य घटना आहे. वाघांच्या डरकाळ्या त्यांच्यासाठी नित्याच्या झाल्या आहेत. या डरकाळ्यांमुळे आता स्थानिक घाबरत नाहीत. नांदगाव जानी गाव उत्तर ब्रह्मपुरी पर्वतरांगांतर्गत जंगलाच्या काठावर वसलेले आहे. काही दिवसांपूर्वी याठिकाणी एक घटना घडली. या गावातील शेतकरी गोवर्धन डांगे यांनी त्यांची सरुवात नियमित कामाने केली. ते भातशेतीला पाणी देत असतानाच जवळच असलेल्या वाघिणीने त्यांच्यावर झेप घेतली. मात्र, ते घाबरले नाहीत. तब्बल दहा मिनिटे त्यांच्यात संघर्ष झाला आणि या संघर्षातून त्यांनी आपली सुटका करुन घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात घनदाट जंगलाच्या काठावर सुमारे ९००हून अधिक गावे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या बातम्या वारंवार येत असतात. विशेषतः ब्रह्मपुरी भागात वाघ आणि बिबट्यांच्या चकमकींमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ब्रम्हपूरी विभागात ‘टीएन-१’ वाघिणीने धुमाकूळ घातला होता. तिच्या हल्ल्यात कुणी मृत्युमुखी पडले नसले तरीही तिघांना तिने जखमी केले होते. ब्रह्मपुरी विभागातील शेती क्षेत्रात अडथळा निर्माण करणाऱ्या ‘टीएन-१’ वाघिणीला आज सकाळी पाच वाजून २३ मिनिटांनी तळोधी रेंज येथे बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढू नये, हाच यामागचा उद्देश होता. आजवरचा जेरबंद केलेल्या वाघांचा इतिहास पाहता ही वाघीण देखील कायमची जेरबंद होऊ नये यासाठी तिला दुसरीकडे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला वनखात्यातील वरिष्ठांनी देखील मान्यता दिली. तातडीने या वाघिणीसाठी आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेचा अंदाज घेऊन वाघिणीच्या सुटकेसाठी ठिकाण निश्चित करण्यात आले. अवघ्या काही तासातच या जेरबंद केलेल्या वाघिणीला घनदाट जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, नेमबाज अजय सी. मराठे, जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा आणि आरआरटी चमूच्या या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.