चंद्रपूर : उन्हाळ्यात लागणारा आंबा चक्क पावसाळ्यात आल्याची घटना चंद्रपुरात उघडकीस आली असून यामुळे सर्वत्र कुतुहल व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्यात लागणारा आंबा हा पावसाळ्यात लागण्याचे तज्ञाचे म्हणणे आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला आंब्याच्या झाडाला बहर येतो, मग फळ येण्यास सुरूवात होते. मात्र, सिस्टर कॉलनी नगिनाबाग परिसरात अजिंक्य कुशाब कायरकर यांच्या घरी असलेल्या आंब्याच्या झाडाला चक्क पावसाच्या दिवसांमध्ये आंबे लागले आहेत. झाडाला पावसाळ्यात आंबे लागल्यामुळे सर्वत्र कुतुहल व्यक्त होत आहे. आंब्याच्या झाडाला मार्च महिन्यामध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर एप्रिल, मे महिन्यात हळूहळू आंबे लागतात. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी वातावरणात बराच बदल झाला. ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती झाली होती. जून व जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. मध्यतंरी पावसाने अनेक दिवस उघडीप घेतली. त्यामुळे वातावरणात मोठा बदल होवून प्रचंड ऊन, गर्दी व साथींच्या रोगांचे प्रमाण वाढले होते. या वातावरण बदलाचा फरक फळझाडांवरसुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील या बदलामुळे सीझन नसताना आंब्याच्या झाडाला आंबे लागल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०२३ या वर्षामध्ये जागतिक वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. या बदलाचा सूक्ष्म अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. हा बदल भविष्यासाठी चिंताजनकही ठरू असू शकतो असे तज्ञांनी सांगितले.
हेही वाचा – वर्धा : नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा गळा आवळून खून, प्रियकरावर संशय
हेही वाचा – नागपूर : केअर रुग्णालयातील ७० रुग्ण इतरत्र हलवले; पावसाचा तडाखा, धावाधाव
दरवर्षी आमच्या घरच्या आंब्याच्या झाडाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबे लागायचे. हे झाड आता २० वर्षांचे आहे. मात्र, यावर्षी भर पावसात आंबे लागले असून ते पक्वही झाले आहेत. वातावरणाच्या बदलामुळेच असे झाले असावे. – अजिंक्य कुशाब कायरकर