चंद्रपूर : वडील ट्रक ड्रायव्हर, ट्रकची स्टेरिंग हातात घेता घेता त्याच्या हातात पुस्तके पडली. बाबासाहेबांच्या विचारांची सोबत केली. दलित वस्तीतली पोरं शिकावी, यासाठी मोफत शिकवणी वर्ग घेतले. ध्येयाने पछाडलेल्या तरुणाने ध्येय फौंडेशन सुरू केलं. आता त्याच्या सामाजिक कर्तुत्वाचा आलेख उच्चशिक्षणासाठी लंडनच्या जागतिक विद्यापीठापर्यंत घेऊन गेला. जय भारत चौधरी (वय २४) या तरुणाची शिक्षणभरारी प्रेरणादायी आहे. ट्रक ड्रायव्हरचा पोरगा आता लंडनला उच्चशिक्षणासाठी निघाला आहे.
बल्लारपूर शहरातील बुद्धनगर दलित वस्तीत लहानाचा मोठा झालेल्या जय चौधरी या तरुणाची इंग्लंड येथील जगातील नामांकित एडिनबर्ग विद्यापीठ स्कॉटलंड येथे ‘सामाजिक शिक्षण तसेच डेटा असमानता आणि समाज’ या विषयाच्या उच्चशिक्षणासाठी निवड झाली आहे. या विद्यापीठाचा जागतिक पहिल्या १५ विद्यापीठांत समावेश आहे. त्यासाठी जयला महाराष्ट्र शासनाची राजर्षी शाहू महाराज परदेशी उच्चशिक्षण शिष्यवृत्तीही मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या पुढील वर्षभराच्या शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तीतून होणार आहे. एका ट्रक ड्रायव्हरच्या मुलाचा हा शैक्षणिक प्रवास समाजाला दिपवणारा आहे.
हेही वाचा : नदीवर पार्किंगसाठी ६० फूट स्लॅब टाकल्याने नागपुरात पूर,ॲक्वा पार्कसाठी नदीवर अतिक्रमण
मराठी शाळेत शिक्षण अन् इंग्रजीवर प्रभुत्व….
जयचे दहावीपर्यंत शिक्षण बल्लारपुरातील सर्वोदय विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. बारावी हैदराबाद येथून पूर्ण केले. तर संगणक विज्ञानाची पदवी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे पूर्ण केली. मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याने सुरुवातीला जयला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने व शिक्षणासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने आई-वडिलांनी ओव्हरटाईम काम करायला सुरुवात केली. हे सगळे चित्र जय बघत असल्याने ही परिस्थिती बदलली पाहिजे, हा दृढ निश्चय करून इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. आता थेट लंडनच्या जागतिक विद्यापीठात मराठी माध्यमात शिकलेल्या जयने प्रवेश निश्चित केल्याचा आनंद कुटुंबीय व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : गोंदिया:भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; २ महिलांचा मृत्यू
ध्येय फाउंडेशनद्वारे २५० हून अधिक युवकांना त्याने विहारात शिक्षणाचे धडे दिले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या जयने आपल्या समविचारी मित्रांना घेऊन ध्येय फाउंडेशनची स्थापना केली. बाबासाहेबांची जयंती ढोल-ताशात साजरी करण्याऐवजी त्याच खर्चात वंचित बहुजन घटकातील मुलांना शिक्षणाची दिशा मिळावी, यासाठी त्यांनी वार्डातीलच पंचशील बुद्ध विहारात पंचशील अकॅडमी सुरू केली. या अकॅडमीद्वारे आतापर्यंत २५० हुन अधिक मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करून त्यांना उच्च शिक्षणाचे धडे दिले. मोफत इंग्रजीचे वर्ग घेतले. यातील बरेच विद्यार्थी आता मोठ्या कंपनीत कार्यरत असल्याचे जय अभिमानाने सांगतो. मोफत इंग्रजी शिकवणी वर्गामुळे आत्मविश्वासासह इंग्रजीवर प्रभुत्व काबीज करता आल्याचेही तो सांगतो. याच बुद्ध विहारात मोठे वाचनालय फाउंडेशनद्वारे सुरू केले असून बाबासाहेबांची दुर्मिळ पुस्तकेही मोठ्या प्रमाणात विहारात उपलब्ध आहे.
हेही वाचा : विघ्नहर्ता बाप्पाला भावपूर्ण निरोप, अकोल्यात पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचा उत्साह
शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठीच…
प्रतिकूल परिस्थितीवर आपण शिक्षणानेच मात करू शकतो. बाबासाहेबांची पुस्तके वाचल्यानंतर याची प्रकर्षाने जाणीव झाली. माझं कुटुंब, माझ्या आजूबाजूचा समाज अजूनही शिक्षणापासून वंचित आहे. जगातील नामांकित विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर माझ्या शिक्षणाचा उपयोग तळागाळातील वंचित-बहुजन समाजाच्या हितासाठीच करणार आहे. मनात जिद्द असली तर कुठलीच गोष्ट कठीण नाही, हा आता विश्वास वाटतो. पुढील काळात चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील मुलांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सहकार्य करणार असल्याचेही जयने सांगितले.