चंद्रपूर : शहरातील मुख्य मार्गावर लागलेले विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे मोठ मोठे होर्डिंग , स्वागत प्रवेश व्दार तथा बॅनर अपघातासाठी निमंत्रण देणारे ठरले आहेत. तर काही ठिकाणी या स्वागत प्रवेशव्दारात ट्रक, बस अडकल्याने वाहतुकींची कोंडी होत आहे. या स्वागत फलकांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.
चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे विविध उत्सवाचे आयोजन सुरू आहे. बल्लारपूर येथील विसापूर क्रिडा संकुल येथे ६७ व्या राष्ट्रीय क्रिडा महोत्सवापासून या महोत्सवी पर्वाला सुरूवात झाली. अयोध्या येथील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना हा महोत्सव चंद्रपूरात उत्साहात साजरा केला गेला. त्यानंतर बल्लारपूर सांस्कृतिक महोत्सव, ताडोबा महोत्सव, इंडस्ट्रीयल एक्पो तथा इतरही अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या महोत्सवांच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र स्वागत प्रवेशव्दार लावले गेले.
शहरातील मुख्य मार्गावर आझाद बगीचा येथे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागत प्रवेशव्दार लावले आहे. या प्रवेशव्दारात आज सकाळी एक ट्रक अडकून पडला. याच ट्रकच्या मागे एक महामंडळाची बस, त्यानंतर रूग्णवाहिका व इतरही वाहन एका पाठोपाठ एक आले. त्याचा परिणाम वाहतुकीची कोंडी झाली. जोरगेवार यांचे स्वागत फलक अक्षरश ट्रकमुळे पडले. ट्रक जर तिथे नसता तर स्वागत गेट पडून एखादा व्यक्ती जखमी झाला असता.
हेही वाचा…नागपूर : आणखी दीड महिना फुटाळा तलावावर बांधकाम होऊ शकणार नाही, सर्वोच्च न्यायालय म्हणाले…
महापालिका कार्यक्रम झाल्यानंतर स्वागत गेट तत्काळ काढून टाकले. मात्र ताडोबा महोत्सव संपूर्ण सहा दिवसांचा कालावधी झालेला आहे. त्यानंतरही महापालिका प्रशासनाच्या वतीने मुख्य मार्गावरील हा स्वागत गेट काढलेला नाही. तथा जोरगेवार यांनी देखील हा स्वागत फलक तिथून काढलेला हा स्वागत फलक अपघाताला निमंत्रण देणारा ठरला असून वाहतुकीची कोंडी करित आहे. अपघाताला निमंत्रण देणारे हे स्वागत फलक कार्यक्रम संपल्यानंतर तत्काळ काढून टाकणे ही जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा असते. मात्र जोरगेवार यांनी प्रसिध्दीसाठी लोकप्रतिनिधी म्हणून स्वत:ची जबाबदारी झटकल्याचे या प्रकारातून दिसत आहे.