चंद्रपूर : शहर तसेच जिल्ह्यात ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची धडाक्यात विक्री सुरू आहे. तरूण ब्राऊन शुगरच्या आहारी गेल्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ब्राऊन शुगरची विक्री करतांना शहर पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली आहे. महाविद्यालय तसेच इतरत्र ठिकाणी या दोन्ही तरूणांकडून ब्राऊन शुगरची विक्री केली जात होती. अटक केलेल्यांमध्ये सोहेल शेख सलीम शेख (२१) व आवेश शब्बीर कुरेशी (३८) या दोघांचा समावेश आहे. चंद्रपुरात अतिशय छुप्या पध्दतीने ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री सुरू आहे. शहर पोलिसांनी दोघांना अटक करीत ब्राऊन शुगर जप्त केले.
हेही वाचा : VIDEO : “ते” दुचाकीने जात होते, अचानक वाघ डरकाळी फोडत समोर आला अन्…
९ जानेवारीला शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सोहेल शेख नामक युवक हा लपून ब्राऊन शुगरची विक्री करतो, माहितीच्या आधारे पोलीस पथकाने छापा घातला व सोहेल शेख सलीम शेखला अटक केली. सोहेलची अंगझडती घेतली. त्याच्याजवळून ७.१२ ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर सहित एकूण ५७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोहेलची अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, सदर ब्राऊन शुगर हे भंगाराम वार्ड येथे राहणारा आवेश शब्बीर कुरेशी याचे असून मी फक्त विक्री करतो. शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून ताब्यात घेतले असून दोघांवर एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गृह जिल्ह्यातून गांजाची तस्करी?
ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, सपोनी मंगेश भोंगाळे, रमिझ मुलानी, शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, इम्रान खान, भावना रामटेके व संतोष पंडित यांनी केली.