चंद्रपूर : दोन सख्या भावांनी डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी कापड दुकानदाराकडून खंडणी वसूल करण्याचा डाव रचला. त्यातूनच बनावट बॉम्ब प्रकरणाची पटकथा रचली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन सख्या भावाना अटक केली आहे. दरम्यान या संपूर्ण बनावट बॉम्ब नाट्यात पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या गडचांदूर शहरातील बसस्टॉप चौकात मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास भगवती एनएक्स या कापड दूकाना समोर बॉम्ब ठेवलेबाबतची माहीती दूकानाचे मालक शिरीष सूर्यकांतराव बोगावार यांना फोनव्दारे मिळाली होती. बोगावार यांनी लगेच गडचांदुरचे ठाणेदार यांना फोनव्दारे माहीती दिले. त्याचेवरून त्यांनी पोलीस पथक पाठवून त्याचे दूकानासमोर झडती घेतली असता दूकानाचे समोर एक संशयास्पद बॅग दिसून आली. त्यामध्ये दूरून पाहिले असता लाईट टिपटिप करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून गडचांदूर ठाणेदार यांनी सदर माहीती पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना दिली. त्यानंतर चंद्रपूर येथील बॉम्ब शोध पथक (BDDS) यांना दिली.सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधिक्षक, चंद्रपुर व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर हे स्वता घटनास्थळी तात्काळ हजर झाले. तसेच BDDS पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना पाचारण करण्यात आले व त्याचे सहाय्याने सदर बॉम्ब नाहीसा करण्याचे काम राबविले. दरम्यान आरोपी शोध कामी गडचांदूर पोलीस स्टॉप व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, उपविभाग गडचांदूर मधील वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळाबाहेरील CCTV फूटेज व कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन गडचांदूर यांनी दोन संशयीत इसमांना ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचेवर असलेले कर्जामूळे दूकानदार यांना फोनकरून खंडणी मागण्याचे उद्देशाने सदरचे कृत्य केल्याचे कबूल केले. त्यांनतर BDDS पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना सदर बॉम्बची Defuse करण्याकामी पाहणी केली असता सदर बॉम्ब हा बनावटी असल्याचे दिसून आले. सदर प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पूढील तपास ठाणेदार गडचांदूर हे करीत आहेत.
हेही वाचा : नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक, कर्मचारी घड्याळ आणि ‘सुटकेस’ची मागणी का करत आहेत?
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दुकानासमोर बॉम्बची पिशवी ठेवल्यावर आरोपी युवकांनी भगवती वस्त्र भांडारचे मालक शिरीष बोगावर यांना व त्यांच्या पत्नीला मोबाईलवर फोन केला व तुमच्या दुकानात बॉम्ब ठेवला आहे, असे सांगून त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर आरोपी तरुणांना असं वाटलं की बोगावर हे परत फोन करतील. मात्र तसे न होता बोगावार यांनी थेट गडचांदुर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला व दोन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीना बोगावार यांना धमकी देत त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची होती अशी माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपीनी युटुबच्या माध्यमातून सदर बॉम्ब बनविला होता, जर तो बॉम्ब बनावट होता तर पोलिसांना इतका वेळ त्याला खरा की खोटा समजायला वेळ का लागला सदर बॉम्ब बनावट असल्याचे कळताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.