चंद्रपूर : येथील भूमी अभिलेख कार्यालयात वास्तुशांतीसाठी पुजाऱ्याकडून होम हवन केल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र हे जादूटोणाविरोधी कायदा लागू करणारे पहिले राज्य आहे. मात्र, याच राज्यात शासकीय कार्यालयात होम हवन केल्या जात असल्याने सर्वत्र टीका होत आहे. राज्याला फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा आहे. असे असताना या कटिबद्धतेला शेंदूर फासून चक्क शासकीय कार्यालयात होमहवनचे थोतांड करण्यात आले. प्रशासकीय भवन येथील भूमी अभिलेख कार्यालयात हा प्रकार घडला आहे. हे कार्यालय सुरू करण्यासाठी होमहवन करण्यात आले. विशेष म्हणजे, ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती असताना हा कार्यक्रम साजरा करण्यात आला नाही. प्रशासकीय भवनातील अन्न व औषध विभागाच्या कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी आग लागली होती. त्यात समस्त कार्यालय जळून राख झाले. याचा फटका बाजुच्या भूमी अभिलेख कार्यालयालादेखील बसला. त्यामुळे हे कार्यालय देखील बंद झाले होते. यानंतर या कार्यालयाची डागडुजी करण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर भूमी अभिलेख अधीक्षक गिजेवार यांच्या पुढाकारातून या कार्यालयाची वास्तुशांती करण्यात आली.
हेही वाचा : बुलढाण्यात सरकारची दशक्रिया! महादेव कोळी बांधवांनी आंदोलनाच्या दहाव्या दिवशी केले मुंडन
पुजाऱ्याला बोलावून येथे होमहवन करून वास्तुशांती करण्यात आली. भारतीय संविधान सर्व धर्म, संप्रदायाला आपली उपासना पद्धतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देते. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर कोण काय करतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, शासकीय कार्यालयात हा प्रकार सर्रासपणे होत आहे. याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रभारी अधीक्षक गिजेवार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. विशेष म्हणजे यापूर्वी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात देखील असाच अंधश्रद्धेचा प्रकार घडला होता. शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून असे होणारे प्रकार हे पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे.