चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कार्यरत पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी टी – १४ या वाघिणीला जेरबंद करून ५९ वाघांना आतापर्यंत बेशुध्द करून जेरबंद करण्याचा विक्रम केला आहे. वन खात्यात अशी कामगिरी करणारे डॉ. खोब्रागडे एकमेव आहेत. श्रीमती महानंदा मोहुले (रा. फरी) यांना कक्ष क्र. ८५३ मध्ये टी – १४ या मादी वाघीणीने हल्ला करून ठार केले होते, शिवाय टी – १४ वाघीणीचे या परिसरात वास्तव्य कायम असल्याने उसेगाव, फरी, शिवराजपुर, अरततोंडी या मार्गावर आवागमन करणाऱ्या नागरीकांना हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या बऱ्याच तक्रारी होत्या, त्यामुळे वनविभागाकडून सदर वाघीणीचे संनियंत्रण करण्याची कार्यवाही सुरू होती.
टी – १४ या मादी वाघीणीने रस्त्याने आवागमन करणाऱ्या नागरीकांवर धावून हल्ला करण्याची प्रवृत्ती पाहता व सदर वाघीणीमुळे भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म.रा. नागपुर यांचे परवानगीने रविवार १७ सप्टेंबर रोजी टी – १४ वाघीण (मादी) हिला वडसा वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र-शिवराजपुर मधील कक्ष क्र. ८६६, मध्ये सकाळी ६.४५ वाजता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे तथा आरआरटी प्रमुख टीएटीआर व अजय मराठे, शुटर, आरआरटी सदस्य यांनी डार्ट करुन तो बेशुध्द झाल्यावर त्यांचे चमुचे सहाय्याने वाघीणीला कोणतीही इजा न करता पिंजराबंद केले.
सदरची कार्यवाही वनसंरक्षक रमेशकुमार, (प्रा) गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली धर्मवील सालविठ्ठल, उपवनसंरक्षक (प्रा) वडसा वनविभाग, वडसा, मनोज चव्हाण, उपविभागीय वन अधिकारी, कुरखेडा, विजय धांडे, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) वडसा यांचे उपस्थितीत व वडसा परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी तसेच अक्षय दांडेकर,अमोल पोरटे, वाहन चालक (आरआरटी), मनन शेख, वाहन चालक, वडसा वनविभाग वडसा यांचे सहकार्याने पार पडली. जेरबंद करण्यात आलेल्या टी -१४ वाघीण (मादी) चे वय अंदाजे २ वर्षे असुन सदर वाघीणीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपुर येथे हलविण्यात आले आहे.