चंद्रपूर : सरकारकडून जरांगे पाटील यांची फसवणूक झाली असेल तर तो सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामधील विषय आहे. उपोषण मागे घेताना काय समझोता झाला होता, कोणत्या अटी शर्ती होत्या, आरक्षणाची पूर्तता कशी करणार, हे सरकार आणि जरांगे पाटील बघतील. काँग्रेसची भूमिका गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा : यवतमाळात होणार ‘अहंकार’ प्रतिमेचे दहन, दुर्गोत्सव सामाजिक बांधिलकीचा उत्सव
चंद्रपूर येथे विश्राम गृह येथे माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांनी सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत दिलेल्या अल्टिमेटमवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका मांडली. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच आमची भूमिका राहिली आहे. सरकारला जर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे वाटत असेल तर ते आरक्षण देतील. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले तेव्हा काही तरी समझोता झाला असेल. त्यामुळेच त्यांनी उपोषणाची सांगता केली होती. आता जर त्यांना वाटत असेल की सरकारने त्यांची फसवणूक केली आहे तर तो सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील विषय आहे. आश्वासनाची पूर्तता झाली नसेल म्हणून जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.