चंद्रपूर : काँग्रेस विधीमंडळ नेते तथा माजी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार) प्रवेश घेणार ही चर्चा जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. असे असतानाच वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक तथा ब्रम्हपुरी नगर परिषदेचे माजी गटनेते विलास विखार, माजी उपाध्यक्ष डॉ.सतिश कावळे, गौरव अशोक भैय्या, माजी पंचायत समिती सभापती नामदेव लांजेवार, सुरेश दुर्वेे यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला खिंडार पडली आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी याच कार्यकर्त्यांसह वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरीत स्वत:च्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा केल्याची माहिती आहे.

काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार मागील पाच वर्षापासून सत्तेपासून दूर आहेत. वडेट्टीवार सत्तेत नसल्यामुळे अस्वस्थ आहेत. याच अस्वस्थतेतून आठ दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथील निवासस्थानी काही विश्वासू सहकाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेशाचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला.

मात्र या प्रस्तावाला अनेकांनी विरोध केला. वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि पून्हा निवडणूक लढवून निवडून यावे लागेल. वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधान परिषदेची उमेदवारी व मंत्रीपद मागितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांविरूध्द गंभीर आरोप आहेत. त्यातील धनंजय मुुंडे यांनी आज राजीनामा दिला तर दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घेतला जाणार आहे.

राष्ट्रवादीचे दोन मंत्रीपद रिक्त होणार आहे व विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक आहे. तेव्हा विधान परिषद व मंत्रीपद द्या अशी मागणी वडेट्टीवार यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान वडेट्टीवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत ११ ते १५ मार्च या कालावधीत घडामोडी होणार असेही कार्यकर्त्यांना सांगण्यात आले होते. ही चर्चा सुरू असतांनाच राष्ट्रवादीत जाण्याची इच्छा नसलेल्या ब्रह्मपुरी विधानसभेतील गौरव अशोक भैय्याजी, नगर परिषद माजी गटनेते विलास विखार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. सतीश कावळे, पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव लांजेवार, सुरेश दर्वे यांसह अनेकांनी आज मुंबईत भाजपात प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला. भाजपा नेतृत्व आणि कार्यावर विश्वास ठेवूनच मागच्या ५० वर्षांपासून काँग्रेसशी जोडलेल्या भैय्या कुटुंबातील अशोक भैय्याजी यांचे पुत्र गौरव, विलास विखार विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक कावळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल. नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांनी भाजपा सदस्य नोंदणी अभियानात सामील व्हावे, प्रमुख नेत्यांना सक्रीय सदस्य बनवावे, भाजपा संघटना वाढीचे काम करावे असे आवाहन बावनकुळे यांनी केले. पक्ष संघटना तुमच्या सदैव पाठीशी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले. भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुखदेव खेने, स्वप्नील सावरकर, मोहन वैद्य, बन्सीलाल कुर्जेकार, निलेश चिंचुरकर आदींचा समावेश आहे. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला खिंडार पडली आहे.

Story img Loader