चंद्रपूर : वरोरा शहरात बनावट मद्य तयार करणाऱ्या दोन आरोपींस अटक करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. अनिलसिंग अजबसिंग जुनी ऊर्फ पिंटू सरदार व आशीष पुरुषोत्तम मडावी, असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. गुप्त माहितीच्या आधारे २४ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी आनंदवन चौक वरोरा येथे आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून ९० मिलीच्या ६०० देशी मद्याच्या बनावट बाटल्या असा एकूण १ लक्ष १६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा : रविकांत तुपकरांच्या अटकेचे पडसाद… ठिकठिकाणी टायरची जाळपोळ
या कारवाईमुळे वरोरा तालुक्यातील बनावट देशी मद्य विक्री करणारा मुख्य सूत्रधार पकडला गेला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात वरोराचे निरीक्षक विकास थोरात, सचिन पोलेवार, दुय्यम निरीक्षक भगीरथ कुडमेथे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जगदीश मस्के, जवान-नि-वाहनचालक विलास महाकुलकर यांनी पार पाडली.