चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील शिवणी उपवन परिक्षेत्रात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. कळमगाव तुकूम येथील भूमिता हरिदास पेंदाम (५८) या शिवनी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उपवन परिक्षेत्र कुक्कधेतीच्या मोहबोडी येथे मोहफूल वेचण्यासाठी गेल्या होत्या. तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

दुपारनंतरही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी वनविभागाला माहिती दिली. शिवनी वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, कुक्कडेटीचे क्षेत्र सहाय्यक एस.वाय. बुल्ले, नरलेश्वरचे क्षेत्र सहाय्यक पेंडोरे व वनरक्षक वन कर्मचाऱ्यांनी जंगलात शोध सुरू केला. दुपारी साडेतीनच्या सुमारास महिला मृतावस्थेत आढळून आली.

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. सिंदेवाही पोलीस ठाण्याचे एसएचओ विजय राठोड, पोलीस उपनिरीक्षक सागर महाल्ले, पोलीस हवालदार नारायण येंगेवार व पोलीस कर्मचारी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मृताच्या कुटुंबाला वन विभाग बफर झोन, शिवनी यांच्याकडून ३०,००० रुपयांची तत्काळ आर्थिक मदत करण्यात आली.