भंडारा: शूभमंगल झाले, कन्यादानही झाले. जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना लग्नमंडपात अचानक दु:ख आणि निरव शांतता पसरली. ज्या वधूपित्याने काही वेळेपूर्वी आपल्या लेकीचे कन्यादान केले, त्या पित्याचा मंडपातच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. कल्पनाही न करविला जाणारा हा प्रसंग आज, २९ रोजी रोजी तुमसर तालुक्यातील झारला गावात घडला अन् अख्खे गाव हळहळले!
कधीही कुणाच्या वाट्याला येऊ नये, असा प्रसंग खरवडे कुटुंबीयांच्या नशिबी आला. तालुक्यातील झारली गावातील गणेश खरवडे यांची सुकन्या पल्लवी हिचा विवाह भंडारा येथील आकाश मंदूरकर या युवकासोबत निश्चित झाला होता. तिथीनुसार आज, २९ रोजी दुपारी १२ वाजता वधूपित्याच्या घरी झारली येथे विधीवत हा सोहळा पार पडला. मंगलाष्टके झाली, वडिलांनी मुलीचे कन्यादान केले. एकीकडे जेवणाच्या पंगती उठत होत्या.
अवघ्या काही वेळाने मुलीची पाठवणी करावयाची असल्याने, तशी तयारी सुरू होती. अशातच अचानक दुपारी २ वाजताच्या सुमारास गणेश खरवडे यांना छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते मंडपातच कोसळले. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुपारी २.३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वधुपित्याच्या मृत्यूची वार्ता लग्नमंडपात पोहचली आणि आनंदाचे वातावरण दु:खात परिवर्तीत झाले. पाठवणीऐवजी वडिलांच्या अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्काराला समोरे जाण्याची वेळ नववधूवर आली. खरवडे कुटुंबीयांवर ओढविलेला हा आघात अकल्पीत होताच, मात्र या प्रसंगाने मंडपातील प्रत्येकाच्या डोळयात अश्रू तरळले. या घटनेने अख्ख्या गावाला हळहळायला भाग पाडले.