नागपूर : कोण म्हणतं शिस्तीत फक्त माणसंच वागू शकतात ! माणसांपेक्षाही शिस्तीत प्राणी वागतात. मग तो जंगलाचा राजा का असेना! ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी अशाच शिस्तीचा परिचय दिला. सैनिकांनाही लाजवेल अशा शिस्तबद्ध चालीत ताडोबाची राणी “छोटी तारा” आणि तिच्या बचड्यांची स्वारी सकाळी सकाळी भ्रमंतीला निघाली. त्यांच्या या शिस्तबद्ध चालीला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील पर्यटक मार्गदर्शक बापू गावतुरे यांनी अलगद कॅमेऱ्यातून टिपले.
ताडोबाच्या जंगलात पहिल्यांदा जर कोणत्या वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आले असेल तर ती ‘छोटी तारा’ला. २०१४च्या सुमारास तिला रेडिओ कॉलर करण्यात आले. २०२० मध्ये नंतर ही कॉलर काढण्यात आली. ताडोबातील मोहर्लीचे वनक्षेत्र हा तिचा मुळ अधिवास. ‘येडा अण्णा’ नावाचा नर वाघ आणि ‘तारा’ नावाच्या वाघिणीच्या पोटी ‘छोटी तारा’चा जन्म झाला. यावेळी ‘तारा’ या वाघिणीला चार पिल्ले होती. हे कुटुंब त्यावेळेस ‘सर्किट गॅंग’ या नावाने ओळखले जात होते. तशीच ओळख आता “छोटी तारा” ने निर्माण केली आहे. अनेक वर्षांपासून ताडोबाच्या जंगलात ‘छोटी तारा’ आपले अस्तित्व दर्शवत आहेत. खरं तर ती आता उतारवयाकडे झुकली आहे, पण तिला पाहिल्यानंतर ते दिसून येत नाही. तिचा बिनधास्तपणा आजही तसाच कायम आहे. तोच गुण तिच्या बछड्यांमध्ये देखील दिसून येतो.
हेही वाचा…काँग्रेसकडून आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था; विजयाची शक्यता असलेल्या अपक्ष आमदारांशीही संपर्क…
‘छोटी तारा’ असोत वा तिचे बछडे, ते अगदी सहजपणे पर्यटकांना सामोरे जातात. कदाचित त्यामुळेच ते अधिक प्रसिद्ध असावेत. अलीकडे तर तिचे बछडे देखील तिचीच ‘री’ ओढायला लागले आहेत. आतापर्यंत ‘छोटी तारा’ने सहावेळा बछड्यांना जन्म दिला आहे. आता सध्या तिच्यासोबत दिसून येणारे आणि प्रचंड मस्तीखोर दिसणारे तिचे बछडे म्हणजे तिच्या पोटी जन्माला येणारे कदाचित शेवटचेच. छोटी ताराचे तिच्या या बछड्यांसोबतच्या अनेक ध्वनीचित्रफिती आणि छायाचित्र अलिकडे समाजमाध्यमावर येत आहेत. पर्यटकांनी भरलेली वाहने असताना देखील ‘छोटी तारा’ बिनधास्तपणे तिच्या बछड्यांसोबत रस्त्यावरुन जाताना दिसून येत आहे. यात त्यांचा रुबाबदारपणाही तेवढाच दिसून येतो. अलीकडेच मोहर्लीच्या गाभा क्षेत्रात तिच्या दोन्ही बछड्यांनी पर्यटकांची चांगलीच करमणूक केली.
हेही वाचा…सोन्याच्या दरात मोठे बदल… सराफा व्यवसायिक म्हणतात…
‘छोटी तारा’चे दोन्ही बछडे दंगामस्ती करत आहेत. सुरुवातीला ते एकमेकांशी भांडत आहेत की काय असाच भास होत असताना, नंतर मात्र ते भांडत नाहीत तर दंगामस्ती करत असल्याचे दिसून आले. आता त्याच “छोटी तारा” चे दोन्ही बछडे चक्क शिस्तीत ताडोबाच्या गाभा क्षेत्रात मार्गक्रमण करताना दिसून आले. पहाटेचा गारवा आणि त्यातच सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेत “छोटी तारा” तिच्या बछडयांसोबत सकाळच्या भ्रमंतीला निघाले. मात्र, हा “मॉर्निंग वॉक” देखील अगदी शिस्तीत होता.