नागपूर : गतीने काम करणारी कंपनी अशी कौतुकाची थाप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मिळालेल्या महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल)चा नागपूरच्या इतवारी-नागभीड रेल्वेमार्गाचा प्रकल्प मागील पाच वर्षांपासून रखडलेला आहे. दरम्यान, रेल्वेमार्ग उभारणीच्या कामाला विलंब होण्यामागे अन्य तांत्रिक व प्रशासकीय अडचणी कारणीभूत असल्याचा दावा महारेलकडून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ६ जानेवारीला राज्यातील सात नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण नागपुरात एका कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी महारेलने अतिशय वेगाने उड्डाणपूल बांधणीचा नवीन विक्रम केला, असे कौतुक केले होते. एकीकडे उड्डाणपुलाच्या बांधणीत गती दाखवणाऱ्या याच कंपनीने फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यातील इतवारी-नागभीड रेल्वेमार्गाचे काम पाच वर्षांहून अधिक काळापासून सुरूच आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाला डिसेंबर २०१९ ला सुरुवात झाली व २० महिन्यात ते पूर्ण करायचे होते.
राज्य सरकार आणि भारतीय रेल्वेच्या निधीतून नागपूर (इतवारी) ते नागभीड हा १०६.२ किलोमीटर रेल्वेमार्ग प्रकल्प साकारला जात आहे. महारेल हे काम करीत आहे. प्रकल्पासाठी प्रारंभी निधीची अडचण होती. त्यामुळे कामाची गती संथ होती. पुढे करोनामुळे काम ठप्प झाले व नंतर वनखात्याचा अडसर निर्माण झाला. या सर्व अडचणी दूर झाल्यानंतरही कामाने वेग घेतला नाही. परिणामी, २० महिन्यांत पूर्ण करावयाच्या कामाला पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी फेब्रुवारी २०२४ मध्ये मिळाली. त्यानंतर उमरेड ते नागभीड या ५६ किलोमीटरचे काम जुलै-ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. तत्पूर्वी, नागपूर (इतवारी)-उमरेड ५० किलोमीटरचे काम एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. आता प्रकल्प पूर्ण करण्याची नवीन मुदत निश्चित करण्यात आली. इतवारी ते उमरेड रेल्वेमार्गाचे काम एप्रिल २०२५ पर्यंत आणि उमरेड ते नागभीड रेल्वेच्या मार्गाचे काम ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे महारेलकडून सांगण्यात येत आहे.
एप्रिलपर्यंत इतवारी-उमरेड मार्गाचे काम पूर्ण होणार
नागपूर ते उमरेडपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर उमरेड ते नागभीड मार्गाचे काम सुरू आहे. प्रारंभी वन्यजीव मंडळाकडून परवानगीची प्रतीक्षा करावी लागली. तर काही ठिकाणी खासगी जमीन अधिग्रहणात वेळ गेला. येत्या एप्रिलपर्यंत इतवारी-उमरेडचे काम पूर्ण करण्यात येईल. उमरेडजवळ गतिशक्ती योजनेअंतर्गत गुड्स टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. हा मालधक्का वेस्टर्न कोलफिल्ड लि.चा राहणार आहे, असे महारेलचे जनसंपर्क अधिकारी विनीत टोके म्हणाले.
महारेल ५ उड्डाणपूल उभारणार
एकीकडे इतवारी-नागभीड रेल्वेमार्ग प्रकल्पाला विलंब होत आहे, तर दुसरीकडे महारेलने पाच उड्डाणपुलांचे काम हाती घेतले आहे. रेशीमबाग चौक ते केडीके कॉलेज चौक, लकडगंज पोलीस ठाणे ते वर्धमाननगर, चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौक, नंदनवन, राजेंद्रनगर ते हसबानग चौक आणि वर्धमानगर पेट्रोल पंप चौक ते निर्मलनगरी या दरम्यान तीन पदरी पाच उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. महारेलचा मुख्य उद्देश रेल्वे पायाभूत सुविधा विकसित करणे आहे. पण, उड्डाणपूल बांधण्याकडे महारेलचा भर आहे. त्यामुळे इतवारी-नागभीड रेल्वेमार्गाच्या कामावर परिणाम झाला काय, असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु, पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ असल्याशिवाय महारेल काम हाती घेत नाही. उड्डाणपूल निर्मितीचा कोणतही परिणाम इतवारी-नागभीड मार्गाच्या कामावर झालेला नाही, असे महारेलचे जनसंपर्क अधिकारी विनीत टोके म्हणाले.