गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवरील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवडाभरात या अपघातात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. मंगळवारी दुपारच्या सुमारास अहेरी येथील युवक सचिन नागुलवार (२९) याच्या दुचाकीला येलचील जवळ ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेनंतर अहेरी परिसरात तणाव असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत बंदची हाक दिली आहे.
सूरजागड लोहखनिज प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून विकास आणि रोजगाराचे मोठ मोठे दावे केल्या जात आहे. मात्र, या खनिजाच्या वाहतुकीसाठी लागणारी पायाभूत सुविधा अद्याप निर्माण न केल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आठवडाभरात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने धडक दिल्याने पाच जणांना जीव गमावावा लागला. यातील सर्वच मृतक कर्ते तरुण असल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. २५ नोव्हेंबररोजी खमनचेरू येथील ट्रक थांब्यावर सचिन तीवाडे(३२) हा तरुण चालक ट्रकच्या धडकेत ठार झाला. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले पोरकी झाली.
हेही वाचा : अवघ्या विशीत त्यांना ‘शस्त्रांचा’ मोह भोवला
दोन दिवसांपूर्वी येनापूर मार्गावर झालेल्या अपघातात रामेश्वर गंगाधर कुंभमवार (वय ३८, रा. अनखोडा, ता. चामोर्शी) व रियांशा धनराज वाढई (वय ८, रा. जामगिरी, ता. चामोर्शी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचदरम्यान कोरची परिसरात देखील दोन अपघात झाले. त्यात तिघांना जीव गमावावा लागला. या घटना ताज्या असताना काल मंगळवारी दुपारच्या सुमारास अहेरीहून एटापल्लीकडे दुचाकीने जाणाऱ्या सचिन नागुलवार आणि शंकर येडगम यांना ट्रकने चिरडले. यात सचिनचा जागीच मृत्यू तर शंकर गंभीर जखमी झाला. सचिनचे नुकतेच लग्न झाले होते. त्याला आठ महिन्याची मुलगी आहे. त्याच्या मृत्यूने घरचा कर्ता तरुण गेला.
हेही वाचा : उपराजधानीला आज व उद्या ‘यलो अलर्ट’; अवकाळी पावसाचे थैमान कायम
या अपघातानंतर अहेरीतील सर्वसामान्यांमध्ये असंतोष असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत निषेध नोंदवून आज अहेरी बंदची हाक दिली आहे. रात्री सचिनचा मृतदेह अहेरीच्या मुख्य चौकात ठेवण्यात आला होता. त्याच्या आई आणि बहिणीने एकच आक्रोश करून पोलिसांना मृतदेहाला हात लावण्यापासून रोखल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अद्याप कंपनीकडून कोणतीही मदत प्राप्त झालेली नव्हती. अनुचित प्रकर घडू नये म्हणून शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.