गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीच्या उदयापासून प्रत्येक घडामोडीचा साक्षीदार असलेला नक्षल नेता जोगन्ना ३० एप्रिल रोजी छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. या चकमकीत एकूण दहा नक्षलवाद्याना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असून त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. त्यात विभागीय समिती सदस्य जोगन्ना उर्फ नरसय्या आणि विनय उर्फ अशोक यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९८० च्या काळात तेव्हाच्या आंध्रप्रदेशातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव झाला. त्यात बरेच उच्च शिक्षण घेतलेल्या तरुण, तरुणीचादेखील सहभाग होता. या रांगेत तेलंगणातील बेलमपल्ली येथील रहिवासी असलेला जोगन्ना देखील होता. शिक्षण कमी असल्याने जोगन्ना चळवळीत मोठ्या पदावर गेला नाही. परंतु प्रत्येक योजनेत त्याचा सहभाग असायचा. जहाल नक्षलवादी नर्मदा, शंकर, तारक्का यांच्यासह चळवळीतील वरिष्ठ नेत्यांसोबत मिळून त्याने गडचिरोलीत चळवळीचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. दक्षिण आणि उत्तर गडचिरोलीत त्याचा वावर होता. मधल्या काळात पोलिसांच्या कारवाईत अनेक मोठे नक्षल नेते ठार झाले. त्यामुळे तो भूमिगत होऊन अबुझमाडमध्ये वास्तव्यास होता. वयाची सत्तरी पार केलेला जोगन्नाला शेवटच्या काळात एटापल्ली, धानोरा आणि अहेरी तालुक्यात पहिल्या गेले. पण तो पोलिसांच्या हाती लागला नाही. गडचिरोलीत त्याच्यावर शंभरहून अधिक गुन्हे दाखल असून २० लाखांपेक्षा अधिक बक्षीस होते. त्याच्या मृत्यूने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. त्याच्यासोबत ठार झालेला विनय हा नक्षल्यांचे आर्थिक नियोजन सांभाळायचा.

हेही वाचा : धक्कादायक! बनावट कागदपत्रांवरून परराज्यातील वाहनांची नागपूर आरटीओत नोंदणी

‘त्या’ अपहरणात प्रमुख भूमिका

२०१० साली आर.आर.पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी श्रीनिवास गोडसेलवार यांचे नक्षल्यानी अपहरण केले होते. यात जोगन्नाने प्रमुख भूमिका निभावली होती. गोडसेलवार यांना नक्षल्यांनी नऊ दिवस ओलीस ठेवले होते. त्यावेळेस पोलिसांनी गोडसेलवार यांच्या सुटकेसाठी थेट कोरनारच्या जंगलात नक्षल्यांच्या ‘कॅम्प’वर धावा बोलला होता. यावेळी मोठी चकमक उडाली होती. त्यातून केंद्रीय समिती सदस्य भूपती आणि जोगन्ना थोडक्यात बचावले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli active naxal leader joganna killed in encounter at abuzmarh ssp 89 css
Show comments