गडचिरोली : गाय वाटप योजनेत घोटाळा केल्याचे सिद्ध झाल्यानंतर ‘आयएएस’ शुभम गुप्ता यांच्याविरोधात तक्रारीचा ओघ वाढू लागला आहे. एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी व भामरागडला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असताना प्रशिक्षणार्थी आयएएस शुभम गुप्ता यांनी बनावट नोटीस बजावून कंत्राटदारांकडून खंडणी वसुली केली तर अन्यायाविरोधात अवाज उठविणाऱ्या नागरिक आणि पत्रकारांवर खोटे गुन्हे नोंदवून तुरुंगात डांबले, असा धक्कादायक आरोप आदिवासींसह मानवाधिकार संघटनेने केला. शहरातील इंदिरा गांधी चौकात निदर्शने करुन पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत गंभीर स्वरुपाचे आरोप केले.
कथित गाय वाटप घोटाळ्यात दोषी आढळल्याने चर्चेत असलेले शुभम गुप्ता सध्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत आयुक्तपदी आहेत. गाय वाटपानंतर वराह पालन योजनेतही त्यांच्यावर लाभार्थ्यांनी आरोप केले. २३ ऑगस्टला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या पुढाकाराने पीडित नागरिकांनी शहरातील इंदिरा गांधी चाैकात शुभम गुप्ता हटाव, महाराष्ट्र बचाव, अशी घोषणाबाजी केली. यानंतर पत्रकार परिषदेत गुप्तांच्या कारनाम्यांचा पाढा वाचला. भामरागड येथील भारती इष्टाम यांना मिळालेला वनपट्टा गुप्ता यांनी म्हणणे मांडण्याची संधी न देता परत शासनाकडे जमा केला. याविरोधात त्यांनी गुप्तांकडे दाद मागितली असता अवमानजनक शब्द वापरले. याविरुध्द इष्टाम यांनी न्यायालयात लढा दिला. अखेर त्यांच्या बाजूने निकाल लागला. बनावट नोटीस बजावून गुप्ता यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप कंत्राटदार विनोद चव्हाण यांनी केला. पैसे न दिल्याने शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा नोंदवून कारागृहात डांबले. शिवाय लॉयड मेटल्स कंपनीकडे केलेल्या कामाचे पैसे कंपनीला दबावात आणून स्वत:च्या खात्यात घेतले, असा दावाही त्यांनी केला. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता आपल्या बाजूने निर्णय आला, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : नेता अडकला, पण कार्यकर्ते खंबीर…मुंबईच्या रस्त्यावर आत्महत्येचे प्रात्यक्षिक…
आयएएस दर्जा रद्द करा
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, आदिवासींच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या मनिषा मडावी यांनी पूजा खेडकरप्रमाणेच शुभम गुप्तांचा आयएएस दर्जा रद्द करावा, ॲट्राॅसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. गडचिरोली जिल्हा आकांक्षित आहे, भामरागड तालुका तत्कालीन राज्यपालांनी दत्तक घेतलेला आहे, अशा ठिकाणी गुप्तांनी गोरगरीब व अशिक्षित आदिवासींवर इंग्रजापेक्षाही भयंकर अत्याचार केल्याचा आरोप खुणे व मडावी यांनी केला. यासंदर्भात योग्य ती कारवाई न केल्यास संपूर्ण देशभर आंदोलन करु , असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा : नागपूर : ‘माया’चे गुढ कायम! ताडोबात वर्षभरानंतरही…
माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. सर्व प्रकरणांत तेव्हा नियमानुसारच कारवाया केलेल्या आहेत. त्याचे पुरावे देखील आहेत.
शुभम गुप्ता, आयएएस व तत्कालीन प्रकल्प अधिकारी, भामरागड.
© The Indian Express (P) Ltd