गडचिरोली : एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असे पाच जणांच्या लागोपाठ झालेल्या गूढ मृत्यूने अहेरी तालुका हादरला आहे. तालुक्यातील महागाव (बु.) येथे २४ तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर ८ ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर १४ ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर १५ ऑक्टोबरला सकाळी मुलानेही अखेरचा श्वास घेतला. सर्व जणांनी चंद्रपूर व नागपूर येथे उपचारादरम्यान प्राण सोडले. २० दिवसांत पाच जणांच्या गूढ मृत्यूसत्राने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहेरी तालुक्यातील महागाव येथे २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे (४५) यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व थकवा जाणवू लागल्याने स्वत:च्या कारमधून पती शंकर तिरूजी कुंभारे (५२) यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. तेथे गेल्यावर त्यांनाही अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तेही उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती झाले. प्रकृती अधिक बिघडल्याने दोघांना नागपूरला हलविले. पण उपचारादरम्यान २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा : चंद्रपूर : ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान राबविणार

आई-वडिलांची प्रकृती बिघडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी होती. त्यांचीही प्रकृती खालावली. तीन दिवस चंद्रपूर येथे उपचार केले. त्यानंतर त्यांची सुटी झाली. मात्र, पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने अहेरी येथे ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पण प्रकृती अधिक खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले.

शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) हा सिरोंचा येथे पोस्ट मास्तर पदावर कार्यरत आहे. आई- वडिलांच्या निधनानंतर गावी आल्यावर त्याचीही प्रकृती खालावली होती. चंद्रपूर येथे उपचारानंतर त्यास नागपूरला खासगी दवाखान्यात हलविले होते. १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याची मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती. ती देखील आजारी पडली. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. या मृत्युसत्रामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून हे गूढ उकलण्याचे पोलीस आणि आरोग्य विभागासमोर आव्हान आहे.

हेही वाचा : चंद्रपूर : माता महाकाली महोत्सवाचे १९ ते २३ ऑक्टोबरपर्यंत आयोजन; लखबीरसिंग लख्खासह ‘या’ गायकांचा भक्तिसंगिताचा कार्यक्रम

रोशनची पत्नी, चालकावरही उपचार सुरु

रोशन कुंभारे याची पत्नी संघमित्रा हिच्यावर नागपूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुुरु आहेत. रोशन व संघमित्रा यांनी काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. एक वर्षाच्या आतच रोशनचा मृत्यू झाला, त्यामुळे दोघांनी पाहिलेले सुखी संसाराचे स्वप्न धुळीस मिळाले. विशेष म्हणजे रोशनच्या आई- वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी (२८,रा.महागाव ) याचीही प्रकृती खालावली असून त्याच्यावरही उपचार सुरु आहेत.

“आई- वडील व विवाहित मुलीच्या मृत्यूप्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. नागपूर येथील दवाखाना प्रशासनाने दिलेल्या पत्रात विषबाधेचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल अद्याप बाकी आहे, तो मिळविण्यासाठी एक टीम नागपूरला पाठवली आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्याशिवाय या घटनेचे गूढ उलगडणार नाही. सर्व बाजूंनी तपास सुरु आहे”, असे अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli aheri taluka 5 family members died suspiciously ssp 89 css
Show comments