गडचिरोली : १७ जुलै रोजी छत्तीसगड सीमेवरील वांडोली या दुर्गम गावाजवळील घनदाट जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले होते. दुसऱ्या दिवशी ‘लोकसत्ता’ने त्या परिसरात जाऊन आढावा घेतला असता सीमा भागातील गावात स्मशान शांतता दिसून आली. तर घटनास्थळावर शिजलेले अन्न, धान्य, दैनंदिन उपयोगातील साहित्य व बंदुकीतील गोळ्यांचा खच पडलेला होता. परिसरातील झाडांवर चकमकीच्या खुणाही दिसून आल्या.

२०२१ साली झालेल्या मर्दिनटोला चकमकीनंतर वांडोली येथे सर्वाधिक नक्षलवादी मारले गेले. यात पाच मोठ्या नक्षल नेत्यांचा समावेश होता. मागील काही महिन्यांपासून छत्तीसगड आणि गडचिरोली पोलिसांनी सीमा भागात चालवलेल्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे सैरभैर झालेले नक्षलवादी आश्रयासाठी घनदाट जंगलाचा आधार घेत आहेत. यादरम्यान ते पोलिसांच्या जाळ्यात सापडत असल्याचे चित्र आहे. १७ जुलै रोजी वांडोली येथे झालेल्या चकमकीत सुद्धा हेच घडले. छत्तीसगडहून नदी पार करून गडचिरोलीच्या जारावंडी पोलीस हद्दीत येत असलेल्या वांडोलीच्या जंगलात नक्षल्यांनी बस्तान मांडले होते. काहीतरी मोठा घातपात घडवण्याची त्यांची योजना होती.

हेही वाचा : बसपाच्या बैठकीत ‘हायहोल्टज ड्रामा’, महिलेने चक्क पदाधिकाऱ्यांच्या…

याच दरम्यान दुपारी दोनच्या सुमारात जेवणाच्या तयारीत बेसावध असलेले नक्षलवादी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यावेळी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. यात १२ नक्षलवादी ठार झाले. तीन पोलीसही जखमी झाले. चकमकीच्या दुसऱ्या दिवशी घटनास्थळी आणि वांडोली परिसरात जाऊन प्रत्यक्षात आढावा घेतला असता जवळपासच्या गावात दहशतीचे वातावरण होते. जेमतेम आठ घरांचे गाव असलेल्या वांडोलीत पावसाळ्यात जाणे कठीण आहे. चकमक स्थळावर बंदुकीतील गोळ्यांचे कवच, शिजलेले अन्न, भाजीपाला, सुखामेवा, औषधे, दैनंदिन वापरातील साहित्य, कपडे व इलेक्ट्रिक साहित्य अद्यापही तसेच होते. चकमक उडाली तेव्हा नक्षलवादी जेवणाच्या तयारीत असल्याचे परिस्थितीवरून दिसून आले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चकमकीनंतर उत्तर गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर आता जिल्ह्यातील दक्षिण भागात केवळ ५० च्या आसपास नक्षलवादी शिल्लक असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : महावितरण ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातील ग्राहकांना २७.७८ कोटी देणार..झाले असे की…

नक्षलवाद्यांचा ‘सेफ झोन’ उद्ध्वस्त?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधून गडचिरोलीत दाखल होण्यासाठी नक्षलवादी वांडोली जंगल परिसराचा सेफ झोन म्हणून वापर करीत होते. घनदाट जंगल आणि नदी नाल्यांनी वेढलेला परिसर यामुळे पोलिसांना त्या भागात पोहोचणे आणि नक्षल्यांचा शोध घेणे आव्हानात्मक होते. त्यामुळे आजपर्यंत नक्षलवादी या भागात लपून असायचे. परंतु या चकमकीनंतर त्यांच्यासाठी हा मार्ग देखील कायमचा बंद झाला आहे. दोन वर्षांपूर्वी वांडोलीजवळील सिनभट्टी भागात झालेल्या चकमकीत एक जहाल महिला नक्षलवादी ठार झाली होती.