गडचिरोली : छत्तीसगडच्या दंतेवाडात झालेल्या चकमकीत जहाल नक्षल नेता मुरलीसह तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. २५ मार्च रोजी ही चकमक उडाली. यात २५ लाखांचे इनाम असलेला जहाल नक्षलवादी व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य सोनासाई उर्फ सुधीर उर्फ मुरली उर्फ रामसाई (६२)याचा समावेश आहे. नक्षल चळवळीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीला पाच वर्षे तो गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होता. चकमकीत तो ठार झाल्याने नक्षलवादी वादी चळवळीला धक्का बसला आहे.

दंतेवाडा व बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील गिरसापारा, नेलगोडा, बोडगा व इकेली या भागात काही नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यावरुन सुरक्षा दलातील राखीव पोलीस जवान (डीआरजी), स्फोटकविरोधी पथकाने दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियान हाती घेतले होते. २५ मार्च रोजी सकाळी आठ वाजता गिदम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीत जहाल नक्षलवादी मुरलीसह अन्य दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. यानंतर परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान केल्याची माहिती दंतेवाडाचे उप पोलीस महानिरीक्षक कमलोचन कश्यप यांनी दिली. घटनास्थळी १२ बोअर रायफल, इंसास रायफल, घातक स्फोटक असा शस्त्रसाठा आढळून आला. याशिवाय दैनंदिन गरजेच्या वस्तूही आढळून आल्या. शस्त्रांसह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. बस्तर परिक्षेत्रात २०२५ मध्ये आतापर्यंत तीन महिन्यांत वेगवेगळ्या चकमकींमध्ये शंभर नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले.

‘मुरली’ची सुरवात गडचिरोलीतून

सोनासाई उर्फ मुरली हा मूळचा तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. अहेरी दलममध्ये १९९५ ते १९९७ पर्यंत त्याने काम केले, त्यानंतर १९९७ ते १९९९ पर्यंत तो पेरिमिली दलममध्ये सक्रिय होता. पुढे त्याने गडचिरोली जिल्हा सोडला व आपला मुक्काम अबुजमाडमध्ये हलविला. तेथून त्याने हिंसक कारवाया केल्या. सुरुवातीला तो चळवळीत नवीन भरती झालेल्या सदस्यांना प्रशिक्षण देत असे, त्याच दरम्यान त्यास डीव्हीसीएम म्हणून बढती मिळाली. मात्र, एका महिला नक्षल्याच्या तक्रारीनंतर त्यास पदावनत केले. त्यानंतर तो इंद्रावती क्षेत्रात एसीएम म्हणून काम करत राहिला. सध्या तो दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य होता.