गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी पहाटे उठून वन्यप्राण्यांचा धोका पत्करून मोहफुल गोळा करतो. विविध भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोहफुलाचे संकलन होते. परंतु व्यापारी हे मोहफुल अत्यल्प भावात खरेदी करतात. जर जिल्ह्यातच मोहफुलापासून मद्यनिर्मिती कारखाना उभा राहिल्यास या मोहफुलांना चांगला भाव मिळेल. पण काही समाजसेवक याला विरोध करीत आहेत. हे आदिवासींचे शोषण असून कारखाना सुरू झाला पाहिजे, असे स्पष्ट करून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्यावर टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
२० जानेवारीरोजी गडचिरोली येथे काँग्रेसच्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोली येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले जिल्ह्यात दारूबंदी केवळ कागदावरच आहे. येथे बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केल्या जाते. मोहफुलाची दारूदेखील तितक्याच प्रमाणात विकल्या जाते. दरवर्षी मोहफुलाचे होणारे संकलन बघता जिल्ह्यात मद्यनिर्मिती कारखाना उभा राहिल्यास या मोहफुलाला चांगला भाव येईल. आदिवासींची होणारी लूट थांबेल. यातून निर्मित दारूची विक्री जिल्ह्यात करू नका, ही मागणी एकवेळ ठीक पण सरसकट कारखान्याला विरोध करणे म्हणजे आदिवासींचे शोषण आहे. अतिशय परिश्रमाने आदिवासी मोहफुल गोळा करतात, ते डॉ. अभय बंग यांचा मुलगा विकत घेतो काय, असा प्रश्न करून विजय वडेट्टीवार ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही’, असेही म्हणाले.
हेही वाचा : नागपूर : वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न
हिवाळी अधिवेशादरम्यान गडचिरोली ‘एमआयडीसी’ येथे मोहफुलापासून मद्यनिर्मिती कारखान्याचे भूमिपूजन झाले होते. पण दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारू निर्मिती नको, म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग, देवाजी तोफा व दारूबंदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोध दर्शवला होता. त्यानंतर फडणवीस यांनी कारखाना होणार नाही, असे स्पष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : “द काश्मीर फाईल्सने लाखोंचे डोळे उघडले, द दिल्ली फाईल्स अनेकांची झोप उडवणार”, कोण म्हणतंय असं? वाचा…
मोहफुलापासून पोषक लाडू बनवा, योग्य भाव मिळेल – डॉ. अभय बंग
मोहफुलाला योग्य भाव द्यायचे असल्यास दारू हा एकमेव पर्याय नाही. त्यापासून पौष्टिक असे लाडू बनवून अंगणवाडी आणि शाळांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून वाटप केल्यास आपोआप मोहफुलाला चांगला भाव मिळेल. सोबतच मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती होईल. मोहफुलापासून मद्यनिर्मिती कारखान्याला केवळ माझाच विरोध नसून ७५ हजार नागरिकांनी १३०० प्रस्ताव शासनाकडे पाठवून विरोध केला आहे. हेच त्यावर उत्तर आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवर समाजसेवक डॉ. अभय बंग यांना विचारणा केली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.