गडचिरोली : गडचिरोली अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. अशात गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवण्यात आल्याने बारमाही वाहणाऱ्या नद्या कोरड्या पडल्या आहेत. यासोबत रानटी हत्तीनी धुडगूस घातला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तरीही दोन पालकमंत्र्याना शेतकऱ्यांपेक्षा खाजगी कंपन्यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यात अधिक रस आहे. अशी टीका जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.

जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी सारख्या मोठ्या नद्या आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तर कधी गोसिखुर्द धरणातील विसर्ग किंवा मेडीगड्डा धरणातील ‘बॅकवाटर’मुळे जिल्ह्यात वारंवार पुरस्थिती निर्माण होते. यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते.

या त्रासाला कंटाळून भरपाई भरून काढण्यासाठी नदी काठावरील अनेक शेतकरी उन्हाळी पिक घेतात. मात्र,गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासोबतच अनेक पाळीव प्राणी, जंगली जनावरे यांनाही पिण्याच्या पाण्याची अडचण येत आहे. नदी काठावरील गावातील भूजल पातळी सुद्धा कमी झाल्याने अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. दुसरीकडे आरमोरी, गडचिरोली भागात मागील काही वर्षांपासून रानटी हत्तीनी शेतात मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. हा उच्छाद अजूनही सुरूच आहे. आरमोरी भागात दोन दिवसांपूर्वी रानटी हत्तींनी मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याला लाभलेल्या दोन पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडे यासाठी वेळ नाही. खाजगी कंपन्यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहतात. अशी टीका ब्राह्मणवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

…तर नदीपात्रात आंदोलन

जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला असताना राज्य कर्त्यांना त्यांच्यासाठी वेळ नाही. या संकटाकडे पालकमंत्र्यांनी आठ दिवसात गांभीर्याने लक्ष न दिल्यास काँग्रेसने नदी पात्रात उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात ब्राह्मणवाडे यांनी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून काही मागण्या देखील केल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यावर काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.