गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेद्रांची निर्मिती करण्यात आली. परंतु या केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने येथील आदिवासींना उपचारासाठी वणवण भटकावे लागते. असाच दुर्दैवी प्रसंग एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावातील चार वर्षीय अत्याचार पिडीत बालिकेच्या पालकांवर ओढवला. अखेर त्या चिमुकलीला उपचारासाठी नागपूरला न्यावे लागले.
यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य उपकेंद्राला टाळे ठोकून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना डांबले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यावस्था पुन्हा एकदा टीकेच्या केंद्रस्थानी असून आदिवासींची हेळसांड केव्हा थांबणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…Video: वाघिणीला तहान लागली; मग तिने असे काही केले की…
९ मार्च रोजी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी आरोग्य पथकात शिपाई पदावर कार्यरत संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) याने घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर घरी बोलावून अत्याचार केला. प्रकरणाची वाच्छता झाल्यानंतर पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेले, पण तिथे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे उपचारासाठी मुलीला घेऊन ते रात्री जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पोहोचले. मुलीला १० मार्चला सकाळी अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. पीडितेच्या आईच्या जबाबावरून गडचिरोली ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक देखील करण्यात आली. मात्र, गावात प्राथमिक आरोग्य पथक असताना पीडितेला उपचारासाठी वणवण भटकावे लागल्याने गावकऱ्यांनी आरोग्य विभागावर रोष व्यक्त केला.
सोमवारी आरोग्य पथकाच्या इमारतीला टाळे ठोकण्यात आले. कर्तव्यावर सतत गैरहजर राहणारे जारावंडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार व कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांचा रोष होता. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी जारावंडीला भेट देऊन गावकऱ्यांना कारवाईचे आश्वासन दिले.
हेही वाचा…“गडकरींच्या हातात मोदींचं नशीब…”, पुसदच्या सभेत उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका
डॉ. कोटवार यांच्याकडे जिल्हा हिवताप अधिकारी पदाचा प्रभार आहे. त्यामुळे ते गडचिरोलीत असतात. मागील काही महिन्यांपूर्वी ‘लोकसत्ता’ने आरोग्य विभागातील प्रतिनियुक्तीचा घोळ उजेडात आणला होता. परंतु यावर कुठलीही कारवाई झाली नाही. उलट काही दिवसांनंतर जारावंडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोटवार यांच्याकडे जिल्हा हिवतापचा प्रभार देण्यात आला. दुर्गम भागात अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य सेवा कुचकामी ठरत असताना त्या भागात कार्यरत वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा मुख्यालयी प्रतिनियुक्ती कशी काय दिली जाते, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
हेही वाचा…नागपूर : झटपट पैसे कमविण्याचे आमिष; युवकाची २६ लाखांची फसवणूक
गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दुर्गम जारावंडीला भेट देऊन टाळे उघडले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. सोबतच त्यांनी आरोग्य पथकातील तीन कंत्राटी डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी डॉ. कोटवार यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दुर्गम भागातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी कडक पावले उचलण्याचे संकेत दिले असून प्रतीनियुक्तीचा घोळ लवकरच संपुष्टात आणणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.