नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे असलेला हत्ती कॅम्प वनखात्याकडून दुर्लक्षित असताना, आता पेंच व्याघ्र प्रकल्पात मात्र कर्नाटकातून हत्ती आणून नव्याने हत्ती कॅम्प तयार केला जात आहे. वनखात्याच्या या भूमिकेवर वन्यजीवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात बचाव कार्य आणि गस्तीसाठी कर्नाटकातून चार हत्ती आणले जात आहेत. हा प्रकल्प जवळजवळ पूर्णत्वास आला आहे. या चार हत्तींबरोबर माहूत आणि चाराकटरही येणार आहेत. मानव-वन्यप्राणी संघर्षासारखी गंभीर समस्या हाताळण्यासाठी या व्याघ्र प्रकल्पात स्वतंत्र हत्ती कॅम्प असणार आहे. जेथे वाहनांना प्रवेश नसतो, तेथे गस्तीसाठी हत्ती उपयोगी आहेत, असे वनखात्याचे म्हणणे आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात ‘अवनी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘टी-१’ वाघिणीला जेरबंद करण्याच्या कारवाईदरम्यान प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. मध्य प्रदेशातील हत्तींवर महाराष्ट्राला अवलंबून राहावे लागले. तर ताडोबातील अप्रशिक्षित हत्तीने एका महिलेला पायदळी तुडवले होते. त्यामुळे बचाव कार्य आणि गस्तीसाठी पेंच व्याघ्रप्रकल्पात हत्ती कॅम्प असावा, अशी कल्पना तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांनी मांडली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी कर्नाटकला पत्र लिहिले होते, पण करोनामुळे हा प्रस्ताव रेंगाळला होता.
हेही वाचा : पाच जणांच्या गूढ मृत्यूने अहेरी तालुका हादरला; एकाच कुटुंबातील चार तर अंत्यविधीसाठी…
आता कर्नाटकातून हत्ती आणण्याच्या कार्यवाहीला वेग आला आहे. जे चार हत्ती येत आहेत, त्यातील ‘भीम’ हा हत्ती मूळचा महाराष्ट्रातीलच आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत ८० लाख रुपयांच्या जवळपास आहे. चोरबाहुली येथील बोरबन येथे हत्तींच्या संगोपनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
“महाराष्ट्रातील हत्ती प्रशिक्षित नाहीत. बचाव कार्य आणि गस्तीसाठी प्रशिक्षित हत्तींची गरज असते. हे प्रशिक्षण त्यांना लहानपणापासूनच द्यावे लागते. कर्नाटकातील हत्ती प्रशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर माहूत आणि चाराकटर येत आहेत. ते पेंचमधील माहूत आणि चाराकटर यांना हत्ती हाताळण्याचे प्रशिक्षण देतील”, असे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी म्हटले आहे.
“गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे असलेल्या हत्ती कॅम्पमधील हत्तींसाठी माहूत, चाराकटर, पशुवैद्यक यांची पदे वनखात्याला भरता येत नाहीत. परराज्यातील हत्ती आणून त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहे. जोपर्यंत कमलापूर हत्ती कॅम्पला सुविधा मिळत नाही, तोपर्यंत पेंचमधील हा प्रकल्प प्रत्यक्षात आणू नये”, असे मत जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी व्यक्त केले आहे.