लोकसत्ता टीम

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत गडचिरोलीतून डॉ.मिलिंद नरोटे यांना संधी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना डच्चू देण्यात आल्याने होळी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे ‘लोकसत्ता’ने सर्वात आधी गडचिरोलीत भाजप भाकरी फिरविणार असे भाकीत वर्तवले होते.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गडचिरोलीचे नाव नसल्याने भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवारी भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत गडचिरोलीची घोषणा केली. मात्र यात विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना डच्चू देण्यात आला असून त्यांच्याऐवजी डॉ. मिलिंद नरोटे या नव्या दमाच्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. डॉ. नरोटे हे गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून गडचिरोली परिसरात आपल्या सामाजिक कार्यासाठी त्यांची ओळख आहे. याची दखल घेत भाजपाने त्यांना संधी दिली. लोकसभेतही त्यांचे नाव चर्चेत आले होते. संघ परिवाराच्या अत्यंत विश्वासू चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे बघितले जाते.

आणखी वाचा-स्वत: खासदार झाले, आता आमदारकीसाठी पत्नीला तिकीट… काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी फेरून…

मेक गडचिरोली उपक्रमातील कथित घोटाळ्याचे आमदार होळी यांच्यावर आरोप झाले होते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अनेकदा वादात देखील सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आदिवासी समाजाची नाराजी होती. सोबतच पक्षातील एक मोठा गट देखील त्यांच्या उमेदवारी विरोधात होता. लोकसभेत त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. हे सर्व बघता नेतृत्वाने त्यांना उमेदवारी नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, उमेदवारी धोक्यात असल्याचे समजतात आमदार होळी कालच तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. त्यांनी काही वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेऊन उमेदवारी कायम ठेवण्याची मागणी देखील केल्याचे समजते. सोबतच काँग्रेस नेत्यांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे होळी बंडखोरी करणार की काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाला मतदारसंघ मिळेना… पक्षाने मुलालाही वाऱ्यावर सोडल्याने…

गेल्या अनेक वर्षांपासून केले सामाजिक कार्य आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा हे बघूनच मला नेतृत्वाने संधी दिली. विधानसभा निवडणुकीत नक्कीच या संधीचे सोने करून पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू. -डॉ.मिलिंद नरोटे, भाजप उमेदवार