गडचिरोली : एका कार्यक्रमात काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपण सत्तेत आल्यास माना समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून काढून टाकू, असे विधान केले होते. यावरून माना समाजाने मोघेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून कुरखेड्यात आज मोठ्या संख्येने एकत्र येत मोर्चा काढला. यावेळी मोघेंविरोधात पोलिसांत तक्रारही देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी नागपूर येथे पार पडलेल्या आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपली सत्ता आल्यास वरिष्ठ आयोग नेमून अनुसूचित जमाती प्रवर्गात चुकीने समावेश करण्यात आलेल्या माना समाजाला काढून टाकू असे विधान केले होते. यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी उपस्थित होते. मोघेंच्या या वादग्रस्त विधानावरून माना समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात येत आहे.

हेही वाचा : “महिला आयोग पुरुषांच्या नव्हे, तर विकृतींच्या विरोधात”, रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन

शुक्रवारी कुरखेडा शहरात माना समजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. शिवाजीराव मोघेंचे वक्तव्य हे द्वेषभावनेतून आहे. त्यांनी संपूर्ण माना समाजाचा अपमान केला आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण केली आहे. असा आरोप मोर्चेकऱ्यांनी यावेळी केला. यावेळी पोलिसातदेखील तक्रार देण्यात आली.

हेही वाचा : अरबी समुद्रात पुन्हा चक्रीय स्थिती; राज्यात पावसाची शक्यता

माना समाज

माना समाज विदर्भात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. माना ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे. समाजाच्या स्वतंत्र धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहेत. केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीत माना समाज १८ व्या क्रमांकावर आहे. सन १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगाने माना समाजाला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केले होते. तेव्हापासूनच माना समाज अनुसूचित प्रवर्गात मोडतो. असा दावा माना समजातील नेते करतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli kurkheda city mana community protested against congress leader and former minister shivajirao moghe for controversial statement regarding reservation ssp 89 css