गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिद्दुर गावात मध्यरात्री नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ केली. यावेळी त्यांनी पत्रक टाकले असून त्यात २२ डिसेंबर रोजी बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या हीद्दुर- दोबुर आणि पुढे कोयरकोटी जोडणाऱ्या रस्त्याचे मागील काही दिवसांपासून बांधकाम सुरू आहे. बांधकामस्थळी असलेल्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. यात एक जेसीबी, टँकरचा समावेश आहे.

हेही वाचा : राहुल गांधी आता विदर्भात पदयात्रा काढणार? कसा आहे उपक्रम, जाणून घ्या…

यावेळी पत्रक टाकून त्यांनी २२ डिसेंबर रोजी भारत बंद यशस्वी करा, असे आवाहन केले आहे. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला. विशेष म्हणजे, हा रस्ता पुढे छत्तीसगड राज्याला जोडणारा आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या दहशतीत मागील अनेक वर्षांपासून प्रशासन या रस्त्याच्या बांधकामासाठी प्रयत्नरत आहे, तर नक्षल्यांचा या बांधकामाला विरोध आहे.

Story img Loader