गडचिरोली : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धात पॅलेस्टाईनकडून लढणाऱ्या ‘हमास’ या अतिरेकी संघटनेला नक्षलवाद्यांनी समर्थन दिले आहे. ही संघटना पॅलेस्टाईन जनतेसाठी संघर्ष करीत आहे, असा उल्लेख करून नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवरील प्रतापपुर जंगल परिसरात फलक लावल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
२ ते ८ डिसेंबरदरम्यान नक्षलवाद्यांकडून ‘पीएलजीए’ सप्ताह पाळला जातो. यादरम्यान नक्षलप्रभावित क्षेत्रात ते हिंसक कारवाया करतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील जंगल परिसरात गुरूवारी नक्षलवाद्यांनी दोन फलक लावले. यात त्यांनी इस्रायलचा विरोध केला असून पॅलेस्टाईनकडून लढणाऱ्या ‘हमास’ या अतिरेकी संघटनेला समर्थन दिले आहे. हमास ही दहशतवादी संघटना नसून ते पॅलेस्टाईनमधील जनतेच्या मुक्तीसाठी संघर्ष करीत आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनला समर्थन देऊन त्यांचे हात मजबूत करा. असे आवाहन नक्षल्यांनी केले आहे.
हेही वाचा : ‘किसान रेल्वे’ बंद झाल्याने कृषीमाल वाहतुकीला फटका
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी काही भाजप समर्थकांची हत्या केली होती. त्यानंतर शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यात देखील लागोपाठ तिघांची केली. त्यामुळे ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात दहशतीचे वातावरण आहे.