गडचिरोली : मतदान सुरू असताना तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने तेलंगणा सीमेवर शेवटच्या टोकावरील सिरोंचातील मतदान केंद्रात गोंधळ उडाला होता. अखेर अहेरीवरुन तातडीने हेलिकॉप्टरने नवीन तीन ईव्हीएम पोहोचविण्यात आल्याने प्रक्रिया सुरळीत सुरु झाली.
गडचिरोली पोलीस दलाकडे दोन हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. मात्र, निवडणूक काळात सुरक्षेच्या दृष्टीने दुर्गम, अतिदुर्गम भागात मतदान पथके, ईव्हीएम व इतर साहित्य पोहोचविण्यासाठी आणखी सात हेलिकॉप्टर सज्ज आहेत. एकूण ९ हेलिकॉप्टरद्वारे मतदान अधिकारी व ईव्हीएम पोहोचविण्यात आले आहेत. दरम्यान, ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यास नक्षलप्रभावित व संवेदनशील भागात नवीन ईव्हीएम पोहोचविण्यासाठी अहेरी येथे पोलिस दलाने हेलिकॉप्टर सज्ज ठेवले होते. दरम्यान १९ एप्रिलला सकाळी नऊ वाजता सिरोंचात तीन मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला.
हेही वाचा…खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क; मतदान केंद्रावरील अव्यवस्था पाहून…
अखेर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदित्य जीवने यांनी वरिष्ठांनी संपर्क केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अहेरी येथून राखीव म्हणून ठेवलेल्या ईव्हीएममधून तीन ईव्हीएम हेलिकॉप्टरने पाठवून दिले. त्यामुळे प्रक्रिया पूर्ववत सुरु झाली. सुरक्षेच्या कारणास्तव संवेदनशील भागात यंत्रणेकडून यावेळी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे. सोबतच ‘एअर ऍम्ब्युलन्स’ देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.