गडचिरोली : तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावत जवानांनी त्यांचा तळ उध्वस्त केला.यावेळी घातक स्फोटके घटनास्थळीच नष्ट केली. नक्षल्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. छत्तीसगड सीमेवरील सावरगावजवळील घनदाट जंगलात ५ जूनला सायंकाळी हा थरार घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र -छत्तीसगड सीमेवर ५ जून रोजी दुपारी टिपागड व कसनसूर दलमचे सदस्य सावरगाव अंतर्गत कुलभट्टी गावाजवळील डोंगरावर तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. अपर अधीक्षक कुमार चिंता यांना त्यांनी सी- ६० जवानांसह नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना केले.

हेही वाचा…चंद्रपूर : ताई कन्नमवार यांच्यानंतर सहा दशकानंतर प्रतिभा धानोरकर ठरल्या दुसऱ्या महिला खासदार

महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरील सावरगाजवळ जवानांनी शोधमोहीम सुरु केली. सायंकाळी नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, यानंतर जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.

त्यानंतर परिसरात झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात तारा, बॅटरी, सोलर प्लेट्स, साहित्य आणि काही पिट्टू बॅग आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. सुरक्षा दलाचे नुकसान करण्यासाठी कॅम्पजवळ एक चार्ज केलेला आयईडी देखील ठेवण्यात आला होता.६ जून रोजी सकाळी तो बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने नष्ट केला.

हेही वाचा…तब्बल ४० तोळे दागिने व २७ लाखांच्या रोख रकमेवर डल्ला! मानलेला भाऊ व त्याच्या पत्नीने…

छत्तीसगड सीमेवर तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून पैसे उकळण्यासाठी नक्षल्यांनी बैठक बोलावली होती. जवानांवर गोळीबार केला, पण जवानांनीही जशास तसे उत्तर दिले. नक्षली कॅम्प उध्वस्त करण्यात यश आल्याने नक्षल्यांचा घातपाताचा डाव हाणून पाडण्यात यश आले आहे. परिसरात नक्षलविरोधी मोहीम अधिक गतिमान केली आहे. – नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli police forces destroy naxalite base foil extortion attempt on tendupatta contractors near chhattisgarh border ssp 89 psg