गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना गडचिरोलीचा चौफेर विकास करून ‘स्टील सिटी’ बनवू असे आपल्या भाषणात सांगितले. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची अवस्था पाहता मुख्यमंत्र्यांचे स्वप्न खरंच पूर्ण होणार का, असा प्रश्न उपास्थित होतो आहे. यामुळे जिल्ह्यातील बांधकाम सुरू असलेले आणि पूर्ण झालेल्या महामार्गांचा सुमार दर्जा पुन्हा एकदा चर्चेत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामातील भ्रष्टाचारासंदर्भात नागरिकांकडून कायम ओरड असते. परंतु काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई होत नाही. जिल्ह्यातून जाणारा ३५३ सी हा राष्ट्रीय महामार्ग अर्धवट आहे. आष्टी ते सिरोंचापर्यंत असलेला हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. कधी वनविभाग तर कधी कंत्राटदाराकडे बोट दाखवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मोकळे होतात. सोबतच सुरु असलेल्या कामाचा निकृष्ट दर्जाकडे हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे देसाईगंज ते पुढे कोरची जाणाऱ्या ५४३ सी या राष्ट्रीय महामार्गाचे देखील बांधकाम मागील वर्षीपासून सुरु आहे. येथे देखील मोठी अनियमितता दिसून येते. कुरखेडात या महामार्गाची रुंदी कमी केल्याचीही तक्रार करण्यात आली होती. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. गडचिरोली शहरातून जाणारा ९३० या राष्ट्रीय महामार्गाबद्दल देखील मोठ्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु येथेही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी केली नाही. याच महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार डॉ. मिलिंद यांनी या महामार्गाच्या बांधकामावर असमाधान व्यक्त केले होते. राष्ट्रीय महामार्गांच्या हजारो कोटींची बांधकामात इतकी मोठी अनियमितता सुरु असताना कुणीही अधिकारी यावर बोलण्यास तयार नाही. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारांना काळ्यायादीत टाकण्याऐवजी त्यांनाच कंत्राट देण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. मधल्या काळात प्राधिकरणातील एक अधिकारीच स्वतःच कंत्राटदारी करतो अशी चर्चा होती. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा : Chhagan Bhujbal : “आज हवा तुम्हारी हैं, कल का तुफान…” छगन भुजबळांचा इशारा नेमका कोणाला?

प्रचंड अनियमितता

विकास कामे करताना त्याचा दर्जा आणि गुणवत्ता राखली पाहिजे. शासन यासाठी हजारो कोटी रुपाये खर्च करीत आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बघून बांधकामात प्रचंड अनियमितता असल्याचे दिसून येते. मी वरिष्ठ स्तरावर याबाबत बोलणार आहे, असे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले.

Story img Loader