गडचिरोली : काँग्रेस पक्षाची विभागीय आढावा बैठक आता नागपूरऐवजी गडचिरोली येथे होणार आहे. २० जानेवारी रोजी धानोरा मार्गावरील महाराजा सेलिब्रेशन हॉल ॲण्ड लॉनमध्ये प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबई येथे काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात राज्यभरातून पदाधिकारी सहभागी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यादरम्यान लोकसभानिहाय इच्छुकांचे अर्ज सादर करण्यात आले. त्यावर चर्चादेखील झाली. त्यामुळे विभागस्थरावर आढावा घेऊन लोकसभा उमेदवारांची नावे अंतिम करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुरवातीला नागपूर येथे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु बैठकीचे स्थळ बदलून आता गडचिरोली करण्यात आले आहे. त्यानुसार २० जानेवारी रोजी शहरातील महाराजा सेलिब्रेशन हॉल ॲण्ड लॉनमध्ये ही बैठक होईल.

हेही वाचा : अमरावती : गेल्‍या वर्षभरात प्राणांतिक अपघातांत गेले ३५९ जीव

काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे १८ ते २० जानेवारी, असे तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. १८ जानेवारी रोजी अमरावती येथे, तर २० जानेवारीला गडचिरोली येथे विभागीय आढावा बैठक घेणार आहेत. १९ जानेवारी रोजी ते नागपुरात असतील. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते व्यक्तिगत भेटी घेणार आहेत. या दोन्ही बैठकांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह स्थानिक माजी मंत्री व प्रमुख नेते उपस्थित राहतील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli ramesh chennithala will be present at congress divisional meeting on 20 january ssp 89 css