गडचिरोली : शहरातील एका सहायक अभियंत्याला ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपुरातील आणखी काही पत्रकार ‘रडार’वर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तपासादरम्यान बरेच धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कार्यरत एका तरुण सहायक अभियंत्याला ‘कॉलगर्ल’च्या माध्यमातून ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार रविकांत कांबळे, पोलीस शिपाई सुशील गवई, रोहीत अहीर व ईशानी या चौघांच्या टोळीला गडचिरोली गुन्हे शाखेच्या पथकाने २९ जानेवारी रोजी नागपूर येथे सापळा रचून अटक केली. तर या टोळीतील एक महिला आरोपी फरार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी पोलिसांनी विविध बाजुंनी तपास सुरू केला असून यासाठी एक पथक नागपूरला रवाना केले आहे. त्यामुळे याप्रकरणात नागपुरातील पत्रकारांसह आणखी काही जण अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेली टोळी मागील अनेक वर्षांपासून अशाप्रकारे हनी ट्रॅपच्या माध्यमातून खंडणी वसूल करत होती, यामुळे या अभियंत्याप्रमाणे इतर काही उच्चपदस्थ अधिकारी व व्हाईट कॉलर मंडळी या टोळीच्या जाळ्यात फसल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. बदनामीच्या भीतीने फसवणूक झालेल्यांपैकी अद्याप कोणी पोलिसांकडे तक्रार घेऊन आलेले नाही. मात्र, या टोळीचा खंडणी वसुलीचा हा पहिलाच प्रयत्न नाही, असा पोलिसांचा कयास आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या टोळीची व्याप्ती मोठी आहे. या टोळीत आणखी काही पत्रकार व पोलीस देखील समाविष्ट असल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास गतिमान केला असून आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत.

हेही वाचा : वर्धा : लाखोंचा गंडा घालून ‘बंटी आणि बबली’ पसार!

या टोळीच्या संपर्कात असलेले पत्रकार , फोटोग्राफर व पोलिस कर्मचारी तपास यंत्रणेच्या रडारवर असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोळीतील चार आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांना घेऊन पोलिसांनी नागपूर येथे जाऊन ज्या हॉटेलमध्ये अभियंत्यासोबत चित्रीकरण केले तेथे पंचनामा करून चौकशी केली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.

हेही वाचा : वंचितमुळे अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलणार ? भाजपपुढे आव्हान

तो तेरा काम बिगड जायेगा..!

या प्रकरणात आरोपी असलेला पोलिस कर्मचारी सुशील गवई याचा फिर्यादी अभियंत्याशी झालेल्या संवादाची क्लिप पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात सुशील गवई याने गडचिरोली पोलिस खूप कडक असून ‘एफआयआर होने के बाद तेरा काम बिगड जायेगा’ अशी धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli s assistant engineer honeytrap case nagpur journalists on police s radar ssp 89 css