गडचिरोली : जिल्ह्यात यंदाही झालेले धान्याचे विक्रमी उत्पादन लक्षात घेत तेलंगणा सीमेवरील सिरोंचा येथील कुख्यात तांदूळ तस्कर ‘विरेन सेठ’ आणि उत्तर भागातील माफिया पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. दररोज या तस्कराच्या बेकायदेशीर गोदामातून तेलंगणाहून अवैधपणे आणलेला कोट्यवधींचा तांदूळ थेट सिरोंचा ते आष्टी, देसाईगंज, गोंदिया येथील गिरणी मालकांकडे पाठविण्यात येत आहे. इतक्या उघडपणे हा घोटाळा सुरू असताना प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे जिल्ह्यात घोटाळेबाजांचे राज्य सुरू असल्याचे चित्र आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे हा तालुका आंतरराज्यीय तस्करीचे केंद्र ठरत आहे. भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेत तेलंगणातील करीमनगर येथून या भागात पाच वर्षांपूर्वी तांदूळ माफियांनी पाय पसरायला सुरुवात केली. त्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा अवैध धंदा वाढविला. आसरल्ली मार्गावर तस्कर ‘विरेन सेठ’ने वनविभागाच्या जागेवर बळजबरी ताबा मिळवून गोदाम उभे केले. गोदाम परिसरात ‘सीसीटिव्ही’च्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. कुणीही या भागात गेल्यास त्याला तस्कराचे गुंड धमकी, दमदाटी करतात. याठिकाणी दररोज तेलंगणाहून रेशनिंगचा तांदूळ अवैधपणे आणला जातो. त्यानंतर मोठ्या ट्रकमध्ये या तांदळाची आष्टी, देसाईगंज, गोंदिया येथे तस्करी केल्या जाते. दरवर्षी चर्चेत येणारा ‘सीएमआर’ मधील घोटाळेबाजांशी विरेनचे सबंध असून प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे.

हेही वाचा…गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह; घरखरेदीची कोट्यवधींची गुढी, वाहनांची आगावू नोंदणी, सराफा बाजारात गर्दी

संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ त्याठिकाणी येतो कुठून याचे उत्तर ते देत नाहीत. सोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती विनातपशील वाहतूक परवाना देखील देत आहे. त्यामुळे अहेरी आणि विठ्ठलवाडा मार्गे आष्टी येथील काही माफियांकडे हा तांदूळ पुरविला जातो. पुढे देसाईगंज येथील कुख्यात तस्करांना देखील पुरवठा होतो. हा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या डोळ्यापुढे घडत असताना ते गप्प का आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

हेही वाचा…जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त

दरवर्षी जिल्ह्यात तांदूळ घोटाळ्याची चर्चा असते परंतु थातुरमातुर कारवाई करण्यात येते. शेकडो कोटींची उलाढाल असल्याने या धंद्यात काही राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे. त्यामुळेच उघडपणे होत असलेल्या या घोटाळ्यावर सबंधित विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

Story img Loader