गडचिरोली : ‘काळ आला होता, पण वेळ नाही’ या म्हणीचा प्रत्येय देसाईगंज येथील एका शेतकऱ्याला आज आला. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी शेतीमशागत करत असताना वाघाने त्याच्यावर हल्ला चढवला. मात्र, शेतकरी जोराने ओरडल्यावर वाघ दोन पावले मागे गेला. पुन्हा हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतानाच इतर शेतकरी आरडाओरड करत धावले, त्यानंतर वाघाने माघार घेत तेथून पळ काढला. हा थरारक प्रसंग आज सकाळी साडेअकरा वाजता येथील वैनगंगा नदीकाठच्या शेतात घडला.

गणपत नखाते (४८, रा. जुनी वडसा) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या रब्बी धान लागवडीचे काम सुरू आहे. त्यासाठी त्यांनी शेतात पऱ्हे टाकले होते. लागवडीसाठी शेतीची मशागत करण्यासाठी गणपत नखाते हे आज सकाळी शेतात गेले होते. वैनगंगा नदीच्या काठावर त्यांचे शेत आहे. इतर शेतकरीही आपापल्या कामात होते. दरम्यान, गणपत नखाते आपल्या कामात व्यग्र असताना दाट झुडपात दडून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांच्या पायाच्या मांडीला नखे ओरखडले. त्यामुळे ते जखमी झाले. मात्र, वाघाने हल्ला केल्यावर ते जोराने ओरडले, त्यामुळे नजीकच माजी नगरसेवक सचिन खरकाटे व इतर शेतकरी काम करत होते. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेत वाघाला पिटाळून लावण्यासाठी आरडाओरड केली. यादरम्यान सचिन खरकाटे हे देखील घसरून पडले. त्यामुळे त्यांच्या कंबरेला इजा झाली. वाघ गुरगरला, पण नंतर त्याने तेथून काढता पाय घेतला. जखमी स्थितीत गणपत नखाते व सचिन खरकाटे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार रामदास मसराम यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी शेतकऱ्यांची विचारपूस केली.

हेही वाचा : बुलढाणा : शेगाव गतिमंद विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू

दोन तास उलटूनही वनाधिकारी आलेच नाही

या घटनेनंतर परिसरात वाऱ्यासारखी बातमी पसरली. वाघ दाट झुडपात शिरल्यानंतर त्याला पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने गोळा झाले. यावेळी आरडाओरड व गोंधळ सुरू होता. वनविभागाला कळविल्यानंतर दोन तास कोणीही घटनास्थळी फिरकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. दरम्यान, दोन तासांनंतर वनाधिकारी तेथे आले, त्यांनी गर्दी पांगवून वाघाला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले, पण वाघ झुडपात गायब झाला. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन परिक्षेत्राधिकारी कैलास धाेंडणे यांनी केले आहे.

Story img Loader