गडचिरोली : मागील काही काळापासून नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आक्रमक कारवायांमुळे या हिंसक चळवळीची चारही बाजुने कोंडी झाल्याचे चित्र आहे. यात आणखी भर पडली असून अतिदुर्गम भागातील गावांनी नक्षलवाद्यांना गावात येण्यास मनाई केली आहे. भामरागड तालुक्यातील पोयारकोठी आणि मरकणारच्या ग्रामस्थांनी ठराव घेत गावबंदी केली. यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांना धक्का बसला आहे.

२०२३ साली प्रशासनाने नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनासाठी नक्षल गावबंदी योजना सुरू केली. या अंतर्गत अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दादालोरा खिडकी, ‘प्रोजेक्ट उडान’च्या माध्यमातून गावाकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे पोलीस प्रशासनावर गावकऱ्यांचा विश्वास अधिक वृद्धिंगत झाला आहे. यातूनच मागील काही महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २० गावांनी नक्षल्यांना गावाबंदी केली आहे. गावकरी स्वयंस्फूर्तीने पोलीस प्रशासनाकडे येऊन हा निर्णय घेत आहेत. भामरागड तालुक्यातील पोयारकोठी आणि मरकणारच्या ग्रामस्थांनी गुरुवारी पोलिसांच्या बैठकीत उपस्थित राहून सर्वानुमते नक्षलवाद्यांना गावबंदीचा ठराव घेतला. यावेळी दोन भरमार बंदूका देखील जमा करण्यात आल्या. बैठकीला मोठ्या संख्येने नागरिक उपास्थित होते. नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत आपण पोलिसांच्या बाजूने उभे असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात भामरागडचे उपाविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, कोठी पोलीस ठाण्याचे प्रभारी शरद काकळीज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार

एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला, अशी ओळख असलेल्या भामरागड उपविभागातील या गावांमध्ये गावाबंदी होणे नक्षलवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ही गावे नक्षल चळवळीचा गड अबुझमाड परिसराच्या सीमेवर आहेत. त्यामुळे या गावांवर नक्षलवाद्यांचे वर्चस्व होते. यामुळे येथील गावकरी आजपर्यंत विविध शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित होते. पोलीस दलातर्फे ग्रामस्थांना आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून नक्षलवादाला हद्दपार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी यापुढे नक्षलवाद्यांना अन्न पाणी देणार नाही. नक्षल चळवळीत कुणीही जाणार नाही. बैठकीला उपस्थित राहणार नाही. गावात किंवा लगतच्या जंगल परिसरात नक्षलवाद्यांना थांबू देणार नाही, असा संकल्प केला.

Story img Loader